ST Mahamandal Bharti 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) तब्बल १७ हजार ७४२ चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ही भरती एसटी महामंडळात लवकरच दाखल होणाऱ्या ८ हजार ३०० नव्या बसेससाठी करण्यात येणार आहे.
नव्या बसेससाठी भरती
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत बोलताना सरनाईक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, नव्या बसेसची खरेदी केल्यानंतर त्या चालवण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियमित भरती कधी होणार?
सरकारकडून नियमित भरतीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्या भरतीस मंजुरी मिळेपर्यंत ही कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. मागील वर्षीही कंत्राटी मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती, मात्र ती काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे यंदा घोषित केलेली भरती प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
१७ हजार ४५० रिक्त जागांसाठी भरती
एसटी महामंडळाकडून कंत्राटी पद्धतीने सुमारे १७ हजार ४५० चालक व सहाय्यकांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून ती राज्यातील ६ प्रादेशिक विभागांनुसार केली जाण्याची शक्यता आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित संस्थांकडून एसटी महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करून दिले जाईल.
मासिक वेतन किती असणार?
या कंत्राटी भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. तसेच, निवड झालेल्या चालक व सहाय्यकांना एसटीकडून आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार आहे, जेणेकरून सेवा दर्जेदार व सुरक्षित राहील. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळात नव्या बसेसची भर पडल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली, अखंडित आणि सुरक्षित बससेवा देणे शक्य होईल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
