मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सामिल झालेल्या रोजंदारीवरील ३५० हून अधिक एसटी कामगारांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४ तासांत कर्तव्यावर रुजू न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

राज्यात आतापर्यंत ७ हजार ६२३ एसटी कामगार पुन्हा कामावर परतले असून ८४ हजार ६४३ कर्मचारी प्रत्यक्षात संपात सामिल झाले आहेत. कामावर परतलेल्यांमध्ये प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचाऱ्यांबरोबरच २९५ चालक आणि १३६ वाहक आहेत. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अद्याप  कमीच असून निलंबनाची कारवाईही केली जात आहे.

या संपात रोजंदारीवरील कर्मचारी असून त्यांनाही कामावर परतण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. हे कर्मचारी न परतल्याने त्यांच्यावर सेवा समाप्तीच्या कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यात सध्या सुमारे २ हजार रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक, वाहकही आहेत.  सेवा समाप्तीची कारवाई करण्यापूर्वी मंगळवारी राज्यातील ३५० हून अधिक रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बेकायदेशीररित्या संपात सहभागी झाला असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे.

आपल्या नियोजित कर्तव्याच्या ठिकाणी २४ तासांच्या आत हजर राहून कर्तव्य सुरु करावे, अन्यथा आपली नेमणूक तात्पुरत्या वेतनश्रेणी स्वरुपाची असून ती आपणास कोणतीही पूर्व सूचना न देता केव्हाही संपुष्टात येईल. आपण अटींचा भंग केल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

* बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात फक्त १३ एसटी गाडय़ा सुटतानाच त्यातून २८२ प्रवाशांनीच प्रवास केला होता.

* सायंकाळी चार वाजेपर्यंत सुटणाऱ्या बसगाडय़ांची संख्या ५६ पर्यंत पोहोचली. तर एकूण प्रवासी संख्या ८२४ होती.

एसटी डबघाईला, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त ; यावर्षी ३ हजार ४६१ कोटी रुपयांचा तोटा

मुंबई: करोनाकाळात उत्पन्न घटले असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन खर्च, प्रवासी कर, पथकर यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक झाला असून २०२०-२१ मध्ये महामंडळाला ३ हजार ४६१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच संपामुळे तर एसटीची आर्थिक परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

करोनाची साथ आणि निर्बंध यामुळे गेल्या वर्षांपासून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणेही मंडळासाठी कठीण झाले. सणासुदीच्या दिवसांत तरी उत्पन्न मिळेल या आशेवर महामंडळ असतानाच ऐन दिवाळीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी मंडळाला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत घटलेली प्रवासी संख्या, त्यातच करोनाच्या साथीचा फटका, संप यामुळे एसटीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न हे सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेल्याचे दिसत आहे.

२०१९-२० मध्ये ७ हजार ८७० कोटी ९९ लाख रुपये उत्पन्न मिळाले असताना खर्च ८ हजार ७९० कोटी २० लाख रुपये झाला होता. २०२०-२१ या वर्षांत तर करोना संसर्गामुळे एसटी सेवा पुरती डबघाईलाच आली. या वर्षांत उत्पन्न २ हजार ९८८ कोटी १ लाख रुपये, तर खर्च मात्र ६ हजार ४४९ कोटी रुपये २३ लाख रुपये झाला आहे. परिणामी ३ हजार ४६१ कोटी २२ लाख रुपये तोटा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तोटा वाढला

२०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ३ हजार ५८७ कोटी ८१ लाख रुपये खर्च करण्यात आला, तर एसटी गाडय़ांना लागणाऱ्या डिझेलवर १ हजार ४८६ कोटी ५२ लाख रुपये खर्च, प्रवासी व मोटार वाहन करापोटी ३८० कोटी ७९ लाख, पथकरासाठी ७४ कोटी ९१ लाख, भांडार खर्च ३९६ कोटी ८७ लाख रुपये खर्च झाले. त्यामुळे तोटा वाढला आहे. त्यातच पूर्वकालीन समायोजन आणि अन्य कारणांमुळे एसटीचा संचित तोटा ८ हजार ७८० कोटी ४४ लाख रुपये झाला. २०२१-२२ मध्ये एकूण संचित तोटा १२ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

     वर्ष      प्रवासी संख्या (दररोजची)

२०१७-१८       ६६    लाख ९८ हजार

२०१८-१९       ६५    लाख ९७ हजार

२०१९-२०       ६०    लाख ७ हजार

२०२०-२१       १५    लाख ४ हजार