अलिबाग – एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सवलतीच्या प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी कार्डाबाबत कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे. एका बाजूला या कार्डासाठी १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचा दावा एसटीचे अधिकारी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला वाहकांकडून अद्याप कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे सांगत प्रवाशांना सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आदेश आणि प्रत्यक्ष बसमधील अंमलबजावणी यांच्यातील विसंगतीचा फटका थेट प्रवाशांना बसत आहे.

एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी गुरुवारी अलिबाग बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कार्ड मिळवण्यासाठी असलेल्या खिडकीसमोर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या रांगेत महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती. कार्ड मिळविण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहूनही वेळेअभावी अनेक प्रवाशांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते.

कार्ड काढण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की, मी आतापर्यंत तीन वेळा इथे रांगेत उभा राहिलो; मात्र मला अद्याप कार्ड मिळालेले नाही. वेळेच्या मर्यादेमुळे नंबर येण्यापूर्वीच खिडकी बंद होत असल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगेत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे सवलत मिळवण्यासाठी कार्ड काढायचे की कार्ड काढण्यासाठीच दिवसेंदिवस रांगेत उभे राहायचे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

एसटी महामंडळाकडून महिला प्रवाशांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. याशिवाय दिव्यांग आणि शाळकरी विद्यार्थ्यांनाही शासनाच्या नियमानुसार सवलतीचा लाभ मिळतो. या सवलतींसाठी अनेक वेळा आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्राचा पुरावा ग्राह्य धरला जातो. एसटीकडून काही प्रवर्गांसाठी स्वतंत्र सवलत कार्डाची सुविधाही उपलब्ध आहे. असे असताना आता पुन्हा एनसीएमसी कार्डची आवश्यकता नेमकी कशासाठी? हा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. नव्या कार्डामुळे सवलतीची प्रक्रिया सोपी होणार असेल तर त्याची स्पष्ट माहिती प्रवाशांना देणे आणि प्रत्यक्ष बससेवेत त्याची अंमलबजावणी सुरळीत करणे अपेक्षित आहे. मात्र सध्या कार्ड मिळवण्यापासून ते कार्ड वापरून सवलत मिळण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहे.

काही वाहकांकडून मुदतवाढीबाबत आम्हाला कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असे सांगितले जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. परिणामी एनसीएमसी कार्ड नसल्याचे कारण देत काही प्रवाशांना सवलतीचा दर न आकारता पूर्ण तिकीट घेण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

एनसीएमसी कार्डला १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्‍यावी याबाबत प्रत्‍येक आगारामार्फत वाहकांना सूचना देण्‍यात येत आहेत. – सुहास चौरे, विभागीय नियंत्रक

एनसीएमसी कार्ड म्हणजे काय ?

एन सी एम सी कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड). हे एक प्रकारचे स्मार्ट कॅशलेस कार्ड आहे, ज्याचा वापर सार्वजनिक वाहतुकीचे भाडे देण्यासाठी करता येतो. एसटीच्या तिकिटासाठी हे कार्ड वापरता येते. डिजिटल वॉलेटसारखा त्याचा वापर केला जाऊ शकतो. रोख पैशांवरील अवलंबित्व कमी करून तिकीट व्यवहार अधिक सोपा होतो.