मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने विविध प्रवास करणाऱ्या सामाजिक घटकांचा प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल होणार आहे. आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेल्या या ‘नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. एसटीच्या वतीने ३१ घटकांना सवलतीच्या दरात प्रवास मुभा देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार आहे. प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे. या एका कार्ड मुळे इतर प्रवास करणे सोपे जाणार आहे.
