मुंबई : राज्य रस्ते मार्ग महामंडळाच्या (एसटी) सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविद्या उपलब्ध करुन दिली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सरनाईक यांनी सकारात्मक चर्चा केली.
कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा ही महामंडळाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे सूचना एसटी प्रशासनाला दिले. या बैठकीस एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
