मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींमधून १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक आहे. योग्य नियोजन केल्यास एसटीच्या उत्पन्नात भर पडू शकते, असे या सहलींवरुन स्पष्ट झाले आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शालेय वर्षात दरवर्षी परिक्षांच्या अगोदर वार्षिक सहल आयोजित केल्या जातात. विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतात. या सहली एसटीच्या माध्यमातून आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते.
एसटीच्या माध्यमातून या सहली आयोजित केल्यास त्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि माफक दरात उपलब्ध होतात असा शाळा संचालक व पालकांचा विश्वास आहे. ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीं या सहलींचा लाभ होतो.
एप्रिल ते मार्च या यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने तब्बल २५ हजार ५५८ बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. या उपक्रमातून महामंडळाला १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ते मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाख रुपयांनी अधिक आहे.भविष्यातही शालेय सहलींसाठी एसटी बसेस वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातील.
येत्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांनी खाजगी बसेसऐवजी एसटी बसेसचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
