मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १ जूनपासून राज्यव्यापी स्वच्छता मोहीम सुरू केली. त्यासाठी प्रवाशांकडून दोन रुपये अधिभार आकारला जातो. दररोजच्या ५० लाख प्रवाशांकडून एक कोटी रुपये केवळ स्वच्छतेसाठी जमा होतात. राज्यभरातील ५६० हून अधिक बस आगार, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर आणि एसटी बसांची नियमित स्वच्छता करण्याचे काम एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. स्वच्छता मोहीम सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अनेक आगारातील परिस्थिती पूर्वीसारखी आहे. पावसाळ्यात ही दुरावस्था आणखी वाईट झाली आहे.

राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या दररोज सुमारे १४ हजार बस रस्त्यावर धावतात. जवळपास ५० लाख प्रवासी दररोज एसटीने प्रवास करतात. डेपो आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी महामंडळ प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा अधिभार आकारते. या माध्यमातून एसटीला सुमारे एक कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. हा निधी ज्या उद्देशाने गोळा केला जातो, त्या प्रमाणात प्रवाशांना स्वच्छतेचा लाभ मिळत नाही. पावसाळ्यात या स्वच्छतेची तीन तेरा वाजले आहेत.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही स्वच्छता चांगली व्हावी यासाठी संसद सारखी उच्च दर्जाची वास्तू स्वच्छ करणाऱ्या कंपनीच्या उपकंपनीला हे काम देण्यात आले आहे.

राज्यातील अनेक बसस्थानकांमध्ये स्वच्छतागृहांची दुरवस्था कायम आहे. दुर्गंधी, पाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छ फरशी, तुटलेली स्वच्छता उपकरणे आणि कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ बेसिन, शौचालयातील अस्वच्छता पाहून अनेक प्रवाशांना ओकारी येते, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसरामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बसस्थानकांचा परिसर, बस फलाट, प्रतीक्षालये तसेच अनेक एसटी बसच्या आतील स्वच्छतेबाबतही प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. स्वच्छता मोहिमेची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र अनेक आगारात दिसून येत आहे. स्वच्छतेसाठी आकारण्यात येणाऱ्या अधिभाराचा वापर नेमका किती प्रभावीपणे होत आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ ऑगस्ट रोजी एसटीच्या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत स्वच्छतेसाठी नियुक्त खासगी संस्थेच्या कामगिरीचा आढावा, अधिभारातून जमा झालेल्या निधीचा वापर, आगारातील प्रत्यक्ष स्वच्छतेची स्थिती, पुढील सुधारात्मक उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर स्वच्छता मोहिमेची प्रत्यक्ष परिणामकारकता वाढविण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे प्रवासी आणि एसटी कर्मचारी यांचे लक्ष लागून राहिले आहे.