मुंबई : निलंबित कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊनही काही कर्मचाऱ्यांनी त्याला अद्यापही प्रतिसाद न दिल्याने अशा कर्मचाऱ्यांना पुढील आठवडय़ापासून एसटी महामंडळाकडून बडतर्फीची नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे.

संपाच्या पहिल्या टप्प्यात सेवेतील कायमस्वरूपी असलेल्या २,०८३ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांना पंधरा दिवसांत नोटीसला उत्तर देणे अपेक्षित आहे. यातल्या काही कर्मचाऱ्यांकडून अद्यापही उत्तर न मिळाल्याने बडतर्फीची नोटीस पाठविण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नाईलाजाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखा कठोर कायदा लावण्याची गरज पडल्यास राज्य शासन मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

गुरुवारी संपात सामील असलेल्या १९२ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ९,३८४ पर्यंत पोहोचली आहे. तर रोजंदारीवरील ६१ जणांची सेवासमाप्ती करण्यात आली असून एकूण १ हजार ९८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली आहे. याआधी कारवाईच्या पहिल्या टप्प्यात ११ नोव्हेंबपर्यंत एकूण २ हजार ५३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. या कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसला पंधरा दिवसांत निलंबित कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. ही संधी दिल्यावर काहींनी उत्तर दिले, तर काही कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलेच नाही. त्यानंतर पुन्हा सुनावणीसाठी नोटीस पाठवण्यात आली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे बडतर्फीची नोटीस पाठवण्याशिवाय पर्याय नाही. ही नोटीस पाठविल्यानंतरही पुन्हा सात दिवसांत कर्मचाऱ्यांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली जाईल आणि त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही,तर थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले.

अनिल परब यांचे आवाहन

एसटी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणीही अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. एसटी कर्मचारी हे बेकायदेशीरपणे संपावर गेले आहेत. या संपामुळे प्रवाशांचे हाल होतानाच महामंडळाचेही ४५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान वाढतच आहे. तसेच विलीनीकरणाबाबतची आमची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

..पुन्हा संधी नाही

संपात सामील झालेल्या रोजंदारीवरील एसटी कर्मचाऱ्यांवरही सेवा समाप्तीची कारवाई झालेली आहे. आतापर्यंत १ हजार ९८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा कोणताही निर्णय नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.