मुंबई : राज्य शासनात विलीनीकरण आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याच्या मुद्दय़ावरून गेल्या १३ दिवसांपासून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास एसटी महामंडळाने सुरुवात के ली. मंगळवारी ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई आणखी वाढेल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करून सेवासमाप्तीची कारवाईही होऊ शकते. तर संपात सहभागी असलेल्या अन्य काही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचाही विचार महामंडळ करत आहे.

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. राज्यातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. यात  कामगारांना संपासाठी उद्युक्त करणाऱ्यांचे निलंबन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील ज्या आगारातून संपाची सुरुवात झाली, अशा आगारातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नांदेड विभागातील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगांव, मुखेड, बिलोली, देगलपूर आगारातील ५८, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपूर, आटपाटी आगारातीलही ५८ आणि यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगांव, यवतमाळ आगारातील ५७, तर वर्धा विभागातील हिंगणघाट व वर्धा आगारातील ४०, लातूर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर आगारातील ३१, भंडारा विभागातील तुमसर, तिरोडीया आणि गोंदीया आगारातील ३० कामगारांना निलंबित करण्यात आले. याशिवाय नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर, अक्कलकोट, परभणी, सोलापूर, जालना, नागपूर, जळगाव, धुळे विभागांतर्गत येणाऱ्या आगारातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.  

कारवाई काय?

एसटी गाडय़ा अडविल्याबद्दल, सेवेवरील चालक-वाहकांना कामापासून रोखल्याबद्दल, एसटीचे नुकसान केल्याबद्दल तसेच अन्य कर्मचाऱ्यांना संपासाठी उद्युक्त केल्याबद्दल ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित के ले आहे. त्यांच्यावर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करून सुनावणीसाठी बोलवून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले जाईल. तरीही संपात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाणार आहे.

प्रवाशांची गैरसोय

राज्यातील बंद एसटी आगारांच्या संख्येत वाढ होऊन मंगळवारी त्यांची संख्या २४७ पर्यंत पोहोचली. त्यामुळे आरक्षण केलेल्यांना एसटी महामंडळाकडून तिकिटांचा परतावा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.  खासगी बस आणि अन्य वाहतुकीशिवाय पर्याय राहिला नाही. त्यात काही ठिकाणी धोकादायकरित्या प्रवासी वाहतूकही झाली. एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी प्रवासी बस, शालेय बस, कं पनीच्या मालकीच्या बसगाडय़ा विविध आगारांत आणून उभ्या के ल्या आणि प्रवाशांना बससेवा दिली.