scorecardresearch

‘एमटीडीसी’चे अमेरिकेत नोंदणी कार्यालय

अमेरिकेतील अधिकाधिक पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने अमेरिकेत प्रथमच पर्यटनाचे ‘माहिती व नोंदणी कार्यालय’ अमेरिकेत सुरू केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेतील अधिकाधिक पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने अमेरिकेत प्रथमच पर्यटनाचे ‘माहिती व नोंदणी कार्यालय’ अमेरिकेत सुरू केले आहे. एमटीडीसीद्वारे अमेरिकेत सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून ऐश्‍वर्या कोकाटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याद्वारे एमटीडीसीने दर वर्षी किमान एक लाख अमेरिकन पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे कार्यालय अमेरिकेत महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबाबत माहिती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असून, अमेरिकेतील पर्यटकांना महाराष्ट्राविषयी माहिती देण्याबरोबरच एक सुविधा केंद्र म्हणूनदेखील काम करणार आहे. महाराष्ट्रातील अजंठा-एलोरा, समृद्ध सागर किनारे, शिर्डी, पंढरपूर यासाखी धार्मिक स्थळे, महाबळेश्‍वर, माथेरानसारखी आकर्षक थंड हवेची ठिकाणे तसेच मुंबईतील सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या पर्यटनस्थळांची आणि पर्यटनाविषयीची अन्य उपयुक्त माहिती येथे पुरविण्यात येईल.
महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायासाठी अमेरिका ही खूप मोठी क्षमता असलेली बाजारपेठ असल्याचे सांगत भारतात प्रत्येक वर्षी येणार्‍या अमेरिकन पर्यटकांपैकी सरासरी २२ टक्के पर्यटक महाराष्ट्रालाच पसंती देत असल्याची माहिती एमटीडीसीचे कार्यकारी संचालक पराग जैन-नानुटियानी दिली. देशातील इतर राज्यांचा विचार करता ही संख्या अधिक असून, नवीन सोईसुविधा आणि मार्केटिंगच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेत चांगला ठसा उमटविण्याची इच्छा बाळगत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करणार असल्याचे मनोगतदेखील त्यांनी व्यक्त केले.
या विषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, आक्रमक प्रचाराद्वारे अमेरिकेसारख्या देशाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर पोहचविण्याचे एमटीडीने ठरवले आहे. अशा प्रकारची सुविधा केंद्रे इतर देशांमध्येही सुरु करण्याचा विचार आहे. अमेरिकेतील केंद्रावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टची माहिती, बुकिंग स्टेटस, विविध पॅकेजेस यांची माहिती देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mtdc opens new booking office in usa