करोनाच्या संकटातून सावरायच्या आतच देशातल्या अनेक भागात म्युकरमायकोसिस आजाराचं संकट बळावत आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत याच आजारामुळे तीन लहान मुलांना आपला डोळा गमवावा लागला आहे. हे तिघेही करोनातून बरे होतंच होते की त्यांना या आजाराची लागण झाली.

आजतकने याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. मुंबईच्या काही खासगी रुग्णालयांमध्ये या मुलांवर उपचार सुरु आहेत. या तिन्ही मुलांची वयं अनुक्रमे ४, ६ आणि १४ वर्षे आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये डायबेटिसची लक्षणं दिसून आली नाहीत, मात्र १४ वर्षांच्या मुलामध्ये ही लक्षणं दिसली आहेत. याशिवाय, १६ वर्षांच्या एका मुलीला करोनानंतर डायबेटिस झाल्याचं निदान झालं आहे. या मुलीच्या पोटात काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबईच्या एका खासगी हॉस्पिटलचे डॉक्टर जेसल सेठ सांगतात की त्यांच्याकडे या वर्षी काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेले २ रुग्ण आले, दोन्हीही रुग्ण अल्पवयीन होते. यातल्या १४ वर्षाच्या मुलीची अवस्था फारच वाईट होती. तिच्यात डायबेटिसची लक्षणं दिसत होती. रुग्णालयात दाखल केल्याच्या ४८ तासांमध्येच या मुलीला म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून आली.

डॉक्टरांनी सांगितलं की, या मुलीचा डोळा काढावा लागला. त्यानंतर जवळपास ६ महिने या मुलीची काळजी घ्यावी लागली. सुदैवाने संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला नाही. मात्र तिला आपला डोळा गमवावा लागला.

१६ वर्षीय मुलीबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले की सुरुवातीला तिच्यामध्ये डायबेटिसची लक्षणं दिसत नव्हती, पण करोनातून बरी झाल्यावर तिला काही अडचणी येऊ लागल्या. काळ्या बुरशीचा संसर्ग तिच्या पोटापर्यंत पोहोचला होता. पण तिला वाचवण्यात यश आलं. बाकी दोघांनाही काळ्या बुरशीच्या संसर्गाचा फार मोठा धोका होता. मात्र त्यांचा डोळा काढल्याने ते जिवंत राहिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.