मुंबई : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई शहर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी २० मे पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरीकांनी १५ मे पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजाराच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
वर्ष २०२४ मध्ये तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ही योजना आणली होती. विधानसभा निवडणुच्या तोंडावर केवळ मतदारांना प्रभावीत करण्यासाठी सदर योजना आणल्याचा विरोधकांनी तेव्हा आरोप केला होता. आश्चर्य म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ही योजना अडगळीत गेली होती. त्यासाठी निधीची चणचण असल्याचे कारण सांगितले जात होते.
या योजनेत महाराष्ट्रातील १६१ आणि राज्याबाहेरील ८८ अशी २४९ तीर्थस्थळे आहेत. योजना सर्व धर्मियांसाठी खुली असली तरी योजनेत मुस्लीम धर्मियांची प्रार्थनास्थळे कमी समाविष्ट केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर काही स्थळे वाढवण्यात आली होती. या योजनेत एका प्रवाशाला किमान ३० हजार कमाल मर्यादेत खर्च केला जातो.
सदर योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवण्यात येत आहे. अनुसूचित जातीसाठी असलेल्या निधीतून तीर्थ दर्शन योजना राबवण्यात येत असल्याबाबत सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली होती. त्यामुळे बौद्ध धर्मियांचे पवित्र तीर्थ स्थळ असलेल्या महाबोधी ठिकाणची सरकारने निवड केली.
बोधगयेचे महत्व काय?
बोधगया पवित्र स्थळ हे बिहार राज्यात असून गया शहरापासून १५ किमी अंतरावर आहे. महाबोधी मंदिरासाठी हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. येथील पिंपळ वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. २००२ साली महाबोधी मंदिराला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थाने यादीमध्ये स्थान मिळाले आहे. ५५ मीटर उंचीचे विटांनी बनलेले भव्य असे महाबोधी मंदिर सम्राट अशोकांनी बांधले होते.
