Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana May 2025 Installment Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून या योजनेतील सन्माननिधीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील एक्सवर माहिती दिली आहे.

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना १० हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा ११ वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना उलटला तरीही हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यातच, छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली. दरम्यान, जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. तर, विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलं आहे. या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा केले जात आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे”, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक कराल?

आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन बँक स्टेटमेंट अपडेट करून चेक करू शकता अन्यथा संबंधित बँकेचे अॅप उपलब्ध असेल तर त्यातील स्टेटमेंटही तपासू शकता. सर्वांच्या खात्यात सन्मान निधी जमा होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आज तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर पुढचे काही दिवस वाट पाहा.