केशवराव धोंडगेंच्या घरात सातवा पक्ष

ज्येष्ठ पुत्र शिवसेनेत

shiv sena
शिवसेना ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ज्येष्ठ पुत्र शिवसेनेत

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ राजकारण करणारे कंधारचे माजी आमदार केशवराव धोंडगे यांच्या घराण्यात आता सातव्या पक्षाची नोंद झाली आहे. धोंडगे यांचे ज्येष्ठ पुत्र अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून  होत आहे. अलीकडच्या काही दिवसांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक साधल्याचे काही घटनांमधून समोर आले. या पाश्र्वभूमीवर मुक्तेश्वर धोंडगे यांनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

मुक्तेश्वर यांचे वडील केशवराव धोंडगे दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. १९९५ साली पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा विधानसभेत प्रवेश करता आला नाही. आता त्यांनी वयाची नव्वदी पार केली आहे.  मागील काही वर्षांत धोंडगे यांच्या घरात अनेक पक्षांचा संचार सुरू झाला. त्यांच्या कन्या श्रीमती चित्रा लुंगारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काही संस्थांवर प्रतिनिधित्वही केले. धोंडगे यांचे पुत्र पुरुषोत्तम हे राजकारणात काँग्रेस पक्षासोबत आहेत तर मुक्तेश्वर धोंडगे यांनी शेकापनंतर लोकभारती पक्ष, मग भाजप आणि आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.

केशवरावांचे पुत्र पुरुषोत्तम हे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे जावई आहेत. मधल्या काळात रोहिदास चव्हाण यांनी मनसेत प्रवेश करून लोहा नगर परिषदेत मनपाची सत्ता आणली होती. त्या वेळी पुरुषोत्तम यांनी लोह्यामध्ये मनसेच्या प्रचाराला हातभार लावला होता. ही बाब गणल्यास धोंडगेंच्या घरात सातव्या पक्षाची नोंद होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mukteshwar dhondge in shiv sena

ताज्या बातम्या