Mumbai Lift Accident latest updates : मुंबईच्या नेहरू नगर परिसरातील शमीम टॉवरच्या दहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या मोकळ्या जागेत पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. ही घटना घडली तेव्हा तो मुलगा निवासी इमारतीमध्ये इतर मुलांसोबत लपंडाव खेळत होता, अशी माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रहिवाशांनी सांगितल की, लहान मुलं इमारतीत लपाछपी खेळत होते. मुलगा लिफ्टजवळ लपला होता आणि लिफ्टच्या दरवाजाला टेकून उभा असताना अचानक दरवाजा उघडला आणि तो खाली पडला. तो मुलगा दहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर पडला आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा रहिवाशांचा दावा
स्थानिक रहिवाशांनी असा आरोप केला आहे की, या घटनेपूर्वी अनेक महिन्यांपासून इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितलं, “येथील लिफ्टचा प्रश्न गंभीर आहे. ही काही नवीन समस्या नाही; गेल्या सात महिन्यांपासून हे सुरू आहे. लिफ्ट कधीही नीट चालत नाही. आमच्या मजल्यावर वीज गेली होती, त्यामुळे तिथे अंधार होता. लपाछपी खेळताना मुले अनेकदा लिफ्टच्या कोपऱ्यात लपतात. इतर मुलांनी सांगितलं की तो लिफ्टच्या कोपऱ्यात लपला होता आणि दरवाजाला टेकून उभा होता, तितक्यात अचानक दरवाजा उघडला. तो १० व्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर पडला. त्या मुलाचा मृत्यू झाला होता.”
अधिकारी घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत. या घटनेमुळे निवासी इमारतींमधील लिफ्टची सुरक्षा आणि नियमित देखभालीबाबत रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. लिफ्टच्या दुरवस्थेबाबत रहिवाशांनी केलेल्या आरोपांसह, हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीमुळे घडला याचा तपास अधिकारी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीबाबत पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
