मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन पक्रल्पाचे काम वेगाने सुरू असून नुकताच पालघरमधील एमटी-६ या बोगद्याचे काम पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सरकारने पालघरमधील ४.७९८ हेक्टर वनजमिनी या प्रकल्पासाठी देण्यास मान्यता दिली आहे. बुलेट ट्रेनसाठी पालघरमध्ये होणाऱ्या सात बोगद्यांपैकी दोन बोगदे तसेच पूल या ४ हेक्टर परिसरात होणार आहेत. वसई, डहाणू, तलासरी, पालघर आणि भिवंडीमधील वनक्षेत्र यामुळे बाधित होणार आहे.

पालघरमधील राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ३२४ एकर वन जमीन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक असलेली आणखी ४.७९८ हेक्टर वनजमीन रेल्वे महामंडळाला प्रदान करण्यास राज्य सरकारचे महसूल व वने विभागाने मान्यता दिली. या परिसरात भागात एमटी-३ आणि एमटी-४ हे दाेन बोगदे होणार आहेत. यातील एमटी ३ हा बोगदा १ हजार ४०३ मीटर लांबीचा असून एमटी ४ हा बोगदा १२६० मीटर लांबीचा आहे.

वसई तालुक्यात हे भूयारीकरण होणार असून हा संपूर्ण भाग संरक्षित वनाअंतर्गत येत असल्याने याला वनविभाग तसेच पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता होती. ही परवानगी आल्यानंतर सरकारने ही जमीन द्रुतगती रेल्वे महामंडळाला देण्यास मान्यता दिली आहे.

वसई, डहाणू, तलासरी, पालघर आणि भिवंडीमधील ज्या ४ हेक्टर (११ एकर) जमिनीच्या हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली आहे, त्या भागात आरक्षित वने, खासगी वनक्षेत्रत तसेच तिवरांच्या वनाचा समावेश आहे. येथे बुलेट ट्रेननसाठी भूयारीकरणाबरोबरच रस्ते वळविणे, सब-मेंटेनन्स डेपो, पूल तसेच अन्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. बुलेट ट्रेनसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून हे काम आता आणखी वेगाने पूर्ण होणार आहे.

२७.४ किमीचे बोगदे

प्रकल्पाच्या संपूर्ण मार्गात २७.४ किमी लांबीचे बोगदे निर्माण करण्यात येत आहे. यात २१ किलोमीटर भूमिगत तर ६.४ किमी पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पा आठ डोंगरी बोगदे बांधले जात असून सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी ६.०५ किमी आहे, तर एक ३५० मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते वांद्रे-कुर्ला संकुल ५ किमी भूमिगत बोगदा असून त्याचे काम सप्टेंबर २०२५मध्ये पूर्ण झाले आहे.