Mumbai Ahmedabad Highway condition : मुंबई ते अहमदाबाद हे अंतर सुमारे साडेपाचशे किमीचं. देशातील या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेन चालवण्याचं पहिलं स्वप्न पाहिलं गेलं ते २००९-१०च्या रेल्वे अर्थसंकल्पात. प्रत्यक्ष कामाला सुरुवात २०१७ पासून झाली. येत्या तीन वर्षांत ही बुलेट ट्रेन अवघ्या दोन तासांत मुंबईहून अहमदाबाद गाठेल. गेल्या दशकभरापासून बुलेट ट्रेनच्या या वेगवान स्वप्नापुढे सध्याच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाचं वास्तव मात्र धूसर झालं आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला हा महामार्ग आजही खंगलेल्या अवस्थेत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही खड्डे, असमान सपाटीकरण, अपघात आणि वाहतूक कोंडी अशी दुखणी या महामार्गाच्या दावणीला बांधलेली आहेत.

महाराष्ट्राचा उत्तरेशी तर गुजरात राज्याचा मुंबई, महाराष्ट्र व दक्षिणेतील राज्याशी संपर्क ठेवण्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे महत्त्व १९६० च्या दशकांपासून कायम आहे. एकेकाळी एकपदरी असणारा हा मार्ग सध्या सहा मार्गीकेच्या महामार्गात रूपांतरित झाला आहे. दररोज सरासरी ५० ते ८० हजार वाहनांची रहदारी होत असलेल्या या महामार्गाचे आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. मुंबई विमानतळ, जेएनपीए बंदर यांसह दक्षिण भारतातील मालवाहतुकीसाठीही हा महामार्ग उपयुक्त ठरतो. मात्र, महामार्गाची सध्याची परिस्थिती बिकट झाली आहे.

पावसाळ्यात पडणारे खड्डे व त्याचा वाहतुकीवर होणारा परिणाम तसेच सोमटा, चारोटी, तलासरी भागातील काही अपघात प्रवण क्षेत्रामध्ये नियमित होणारे अपघात हे अनेक वर्ष दुर्लक्षित राहिले. विशेष म्हणजे महामार्गाच्या रुंदीकरणाच्या दरम्यान राबविण्यात आलेल्या उपाययोजना व मार्गीकेच्या सदोष उभारणीमुळे निर्माण झालेले सुरक्षिततेचे प्रश्न हे दुर्लक्षित राहिले होते. महामार्गाच्या दुरवस्थेविषयी त्यावेळी लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांनी अनेक आंदोलने केली. मात्र या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी तत्कालीन शासनाचे प्राधान्य नव्हते.

४ सप्टेंबर २०२२ च्या दुपारी मुंबईकडे निघालेल्या टाटा समूहाचे ज्येष्ठ पदाधिकारी, उद्योगपती सायरस मिस्त्री यांची गाडी चारोटी जवळील एक पुलाच्या कठड्यावर आदळून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघाताची देश, विदेशात मोठी चर्चा झाली व महामार्गावरील मार्गीकांच्या विस्तारा दरम्यान झालेली सदोष आखणी व सुरक्षिततेच्या अपुऱ्या उपाययोजना हे या भीषण अपघाताला बहुतांशी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष यंत्रणेने काढला. यापूर्वी अशाच कारणांमुळे अनेक स्थानिकांना, प्रवाशांना या सदोष आखणी मुळे घडलेल्या अपघातात आपले प्राण या महामार्गावर गमवावे लागले होते. मात्र एका जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या निधनामुळे केंद्र सरकार खडबडून जागे झाले.

सायरस मिस्त्री यांचा ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी काही दिवसातच ट्राफिक ॲटेन्यूएटर अर्थात अपघात समयी धक्के शोषून घेणारे सुरक्षा उपकरण बसवण्यात आले. असेच उपकरण महामार्गावर अन्य काही ठिकाणी बसवण्याचे प्रयोजन करण्यात आले. यानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला खऱ्या अर्थाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांची आखणी करण्यासाठी विविध सर्वेक्षण, लेखापरीक्षण व तज्ञ समितीकडून पाहणी करून उपाययोजना सुचविण्यात आल्या.

पालघर जिल्ह्यात सरासरी २५०० मिलिमीटर पावसाची नोंद होत असून पावसाळ्या दरम्यान महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने दहिसर ते तलासरी दरम्यानच्या राज्यातील महामार्गाच्या १२१ किलोमीटर पट्ट्याचे कॉंक्रिटीकरण अर्थात व्हाईट टॉपिंग करण्याचा ५५५ कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्त्यांचे बळकटीकरण तसेच उपलब्धता याचा पूर्वअभ्यास केला न गेल्याने दररोज किमान ८० हजार वाहनांची वर्दळ असताना हे काम पूर्ण करण्यात आले. या कामादरम्यान इतर संबंधित विभागांशी समन्वयाचा अभाव तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी अपुरी यंत्रणा यावर काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे दर्जा व त्याची समान पातळी राखण्यास अपयश आले.

विशेष म्हणजे या रस्त्याचा काँक्रिटीकरण प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यातील काही भागाला तडे गेले व पहिल्या पावसाळ्यात काँक्रीट उखडून खड्डे पडले. काँक्रिटीकरण प्रकल्प संपल्यानंतर १० वर्षाची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असल्याने उद्भवलेल्या या समस्यांवर उपाययोजना म्हणून प्रथम इपॉक्सी रेझीनचा थर तसेच नंतर विशिष्ट प्रकारच्या रसायन मिश्रित अस्फाल्ट आंथरण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक कॉंक्रिटीकरण पट्ट्यांमधील पॅनल ब्रेकरच्या साहाय्याने मोडून पुन्हा त्यांचे नव्याने कॉंक्रिटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण दरम्यान उद्धवलेल्या अनेक तांत्रिक अडचणी, पुरेशा प्रमाणात देखरेखीचा अभाव, इतर विभागाकडून न मिळालेले आवश्यक सहकार्य यामुळे रस्त्यावरून प्रवासाचा दर्जा अर्थात रायडिंग क्वालिटी मिळत नसल्याची तक्रार पुढे आली. त्यानंतर रस्ते गुळगुळीत करण्यासाठी मायक्रोसर्फेसिंगचा थर काही भागांमध्ये अंथरण्यात आला.

काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या वेळी वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. अनेकदा वाहनांच्या रांगा पाच ते २५ किलोमीटर पर्यंत असल्याने प्रवासाची वेळ निश्चित सांगण्यास गुगल मॅप किंवा तत्सम सॉफ्टवेअर देखील अंदाज व्यक्त करण्यास असमर्थता दाखवत असल्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. हा प्रकल्प झाल्यानंतर या महामार्गावरील प्रवास सुखकर होईल असे दाखवण्यात आलेले स्वप्न काही दिवसातच भंग पावले.

वर्सोवा ते ठाणे दरम्यान घोडबंदर रस्त्याची झालेली दुरवस्था, या मार्गावर घेण्यात येणारे दुरुस्तीसाठी ब्लॉक, वसई ते वर्सोवा पट्ट्यात रस्त्यावर साचणारे पाणी, रस्ता लगत अवजड वाहनांची बेकायदेशीरपणे केली जाणारे पार्किंग, पुलांवर व सेवा रस्त्यांवर असणारे खड्डे, तसेच वाहने बंद पडल्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी अशी अनेक कारणे नव्याने उभी राहिल्याने महामार्गावरून प्रवास करताना पोहोचण्याची निश्चित वेळ समजणे कठीण झाले आहे.

उद्योगपतींचा रेल्वे प्रवास

तारापूर, वापी, सेलवास पट्ट्यात कारखाने असणारे उद्योगपती मुंबई ठाण्यात राहत असून पूर्वी दररोज आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करीत असत. मात्र महामार्गावरील अनिश्चितता लक्षात घेता अनेकांनी रेल्वे प्रवास करणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या मंडळींना स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे अनिवार्य होते अशा अनेकांनी दोन-तीन तासांच्या प्रवासासाठी सात ते आठ तासांपेक्षा अधिक वेळ खर्च केल्याचे तारापूर येथील उद्योजकांची संस्था टीमा चे अध्यक्ष डी. के. राऊत यांनी नमूद केले.

महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे काय?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या तीन वर्षात राज्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना राबवल्याची माहिती प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिली. अपघात प्रवण क्षेत्रामध्ये १० पादचारी पुलांची उभारणी पूर्ण झाली असून नव्याने सहा पादुचारी पूल उभारणी प्रस्तावित आहेत. विक्रमगड फाटा (मनोर), नांदगाव (मनोर), तलासरी, सूत्रकार, सातिवली तसेच हॉटेल दिल्ली दरबार परिसरात वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. याच बरोबरीने महामार्गाचा मुख्य रस्ता तसेच सेवा रस्त्यांच्या बाजूला पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने गटार व्यवस्था उभारण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महामार्गावर २००० पेक्षा अधिक साइन बोर्ड लावण्यात आली असून त्यासह क्रॅश बॅरियर, दुभाजकालगत न्यू जर्सी काँक्रीट बॅरियर, रस्त्याकडेला बांबू बॅरियर उभारण्यात आले असून यापूर्वी बसवण्यात आलेले सुमारे ७० किलोमीटर पेक्षा अधिक लांबीकरिता लोखंडी कॅश बॅरियर कार्यरत आहेत. या खेरीज पादचारी मार्गांसाठी जाळीयुक्त ग्रील व रंबलर उभारण्यात आले असून पुलांचे कठडे, दुभाजक तसेच क्रॅश बॅरियरची उंची वाढवण्यासाठी देखील प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जुन्या पुलांची संरचनात्मक स्थिती तपासली जात असून पुलां मधील निदर्शनास येणार दोष युद्धपातीवर दुरुस्त केले जात असल्याचे ‘एनएचएआय’चे म्हणणे आहे. सुरक्षिततेच्या यंत्रणेत वाढ करण्यासाठी पेट्रोलिंग वाहने व रुग्णवाहिकांची संख्या वाढवली असून अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच बरोबरीने शेव्हलॉन मार्किंग, ब्लिंकर लाईट व रेस्ड पेवमेंट मार्किंग पद्धतीने वाहनांची गती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत असल्याचे सुहास चिटणीस यांनी गेल्या तीन वर्षातील आढावा घेताना सांगितले.

कारवाईचा इशारा

पालघर पोलीस तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून देखील अपघात प्रवण क्षेत्रात संदर्भात आढावा घेऊन ते कमी करण्यासाठी व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांसोबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियमित पणे जाते. वाहकांना सतर्क करण्यासाठी विविध साईनबोर्ड, सूचनाफलक बसवण्यात आले असून मार्गीका शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या तसेच वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई केली जात असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे म्हणणे आहे.