अलिबाग – राज्यातील सर्वात जास्त प्रवासी वाहतूक करणारा जलमार्ग लवकरच बंद होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव चार महिने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

जलप्रवासी मार्ग कोणता?

मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया ते अलिबाग मधील मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते. कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असणारा हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो. दररोज साधारणपणे तीन हजार तर सुट्टीच्या दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. अलिबागहून दक्षिण मुंबईत अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होते. प्रवासाचा वेळ वाचत असल्याने या जलप्रवासी वाहतूकीला प्रवासी आणि पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजे पर्यंत या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अंजठा या खाजगी कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. पावसाळ्यातील चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिने ही जलप्रवासी सेवा नियमित सुरू असते.

पावसाळ्यात का बंद ठेवली जाते जलवाहतूक ?

पावसाळ्यात समुद्र खळवलेला असतो, समुद्रात मोठ्या लाटा उसळत असतात.त्यामुळे गेट वे ऑफ इंडीया जवळ बोटी लावणे अशक्य असते. खोल समुद्रात हलक्या बोटी चालवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात. हिबाब लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही जलवाहतूक सेवा बंद ठेवली जाते. दरवर्षी ठराविक कालावधीसाठी ही वाहतूक बंद ठेवली जाते.

जलप्रवासी वाहतूक कधीपर्यंत बंद राहणार?

यावेळी २६ मे पासून जलप्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा सहा दिवस आधीच जलप्रवासी वाहतूक बंद केली जाणार आहे. ही जलवाहतूक पुन्हा १ सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे.

रो रो सेवा सुरू राहणार

दरम्यान गेट वे ऑफ इंडीया ते मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक चार महिन्यांसाठी बंद होणार असली तरी भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रो रो सेवा मात्र नियमीत सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या वाहनांसह अलिबागला पोहोचणे शक्य होणार आहे.