पश्चिम आशियात युद्धाचे ढग गडद झाले असल्याने त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाल्याने भारतातील साठा मर्यादित झाला असल्याची चर्चा आहे. त्यातच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काही आवाहन केले. त्यामध्ये खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा आणि इंधन बचत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून विरोधकांकडून कडाडून टीका होत असतानाच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा ताफा असल्याचा दावा केला जातोय.

“पंतप्रधान मोदीजी देशाला इंधन बचतीचे धडे देतात आणि दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम चक्क २५ गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पहायला निघतात! ‘साहेबांचा’ सल्ला फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का?” असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारला.

“जनतेला त्यागाचे सल्ले द्यायचे आणि स्वतः मात्र २५ गाड्यांच्या ताफ्यात फिरायचे! मुंबई भाजप अध्यक्षांचा हा ‘शाही’ नालेसफाई दौरा म्हणजे इंधनाची उधळपट्टी नाही की? की अमित साटम गटारातील गॅस वर गाड्या उडवत आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, असाच आरोप आमदार रोहित पवार यांनीही केला. ते म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा २५ गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशीच झालीय.”

रोहित पवारांच्या या ट्वीटला अमित साटम यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या, असे भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. आज मुंबई शहरातील नालेसफाईची अधिकृत पाहणी सुरू होती. या पाहणी दौऱ्यात सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ताफ्यात ७-८ गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहने आमच्या ताफ्यात असल्याचे दाखवून ‘२५ गाड्यांचा ताफा’ असल्याचा बनाव तुम्ही करत आहात. आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी २१ व्या वर्षी बारामती ऍग्रो सारख्या कंपनीचा सीईओ झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही!”

नरेंद्र मोदी यांनी नेमके काय आवाहन केले आहे?

  • पुढील वर्षभर सोने खरेदी टाळा
  • मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधन बचत करा
  • खाद्यतेलाचा वापर कमी करा
  • परदेश दौरे करू नका
  • डेस्टिनेशन वेडिंग न करता भारतातच लग्न करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच असे आवाहन केल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योजक आणि व्यावसायिक यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर, देशभरातील विरोधी पक्षांतील नेत्यांनी मोदींच्या या आवाहनावर सडकून टीका आहे.