मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या ८४ जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेस देण्यास भाजपने ठाम नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे यांना मोजक्याच ७०-८० किंवा त्याहूनही कमी जागांवर समाधान मानावे लागणार असून त्यापैकी काही जागा महायुतीचा पराभव झालेल्या जागांपैकी असणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे) नेत्यांची जागावाटपासाठी नुकतीच पहिली बैठक झाली असून दुसरी आज (गुरूवारी) होणार आहे. भाजपकडून मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, अतुल भातखळकर तर शिवसेनेकडून मंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे आदी नेते सहभागी झाले होते.

पहिल्या बैठकीत भाजपने केवळ ५२ जागा देण्याचा प्रस्ताव दिल्यावर शिवसेनेचे नेते तर अवाकच झाले. शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत जिंकलेल्या ८४ जागा आणि गेल्या काही महिन्यांमध्ये अन्य पक्षांमधून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवकांसाठी काही जागा अशा एकूण १२५ जागांची शिवसेनेने केलेली मागणी भाजपने अमान्य केली आहे. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या ८४ जागांच्या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद नसून काही ठिकाणी अजूनही ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव आहे. त्यामुळे शिंदे यांना केवळ ५२ जागा देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदाराला महापालिका प्रभागनिहाय मिळालेल्या मतांचा आधार भाजपने घेतला आहे. जेथे भाजपला अधिक मते आहेत, त्याठिकाणी भाजप लढणार असून १३०-१४० जागांवर भाजपने दावा केला आहे.

भाजपचा महापौर मुंबईत व्हावा, यासाठी १०० हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती न झाल्यास मुस्लिम बहुल प्रभागातील नेहमी पराभूत होणाऱ्या काही जागा शिवसेनेच्या गळ्यात मारून लढणाऱ्या जागांचा आकडा शिवसेनेला फुगवून दाखविला जाण्याची भाजपची रणनीती असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ८४ हून कमी जागांवर लढण्याची नामुष्की सहन करावी लागण्याची शक्यता आहे.