Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: शुक्रवारी (१६ जानेवारी २०२६) रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राज्यभरात भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसले. राज्यातील २९ महापालिकांपैकी २४ ठिकाणी महायुतीची सत्ता आली. त्यामध्ये ९ महापालिका भाजपाने स्वबळावर जिंकल्या आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रथमच भाजपाने ८९ विक्रमी जागा जिंकल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अनुक्रमे २९ आणि ३ जागा निवडून आल्या आहेत. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा भाजपाचा महापौर होणार आहे. ठाकरे बंधुंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. पण सत्तास्थापनेच्या जादुई आकड्यापर्यंत त्यांना पोहचता आले नाही. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ तर राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने ६ जागा जिंकल्या.
निकालानंतर राज ठाकरेंचे निवास असणाऱ्या शिवतीर्थावर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरेंची विजयी उमेदवारांनी भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे औक्षण केले. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. त्या म्हणाल्या, निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेने पैशांचा वापर केला. विरोधकांनी कल्याण डोंबिवलीसह इतर ठिकाणचे आमचे उमेदवार आणि शाखाध्यक्ष पळविले. तरीही आम्ही लढलो आणि काही ठिकाणी जिंकलो”.
पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “निवडणूक जवळ आल्या की भाजपाने आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार पळविले. जी दिसतील त्यांना पैसे देऊन पक्षात घेतले. तरीही कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे पाच उमेदवार निवडूण आले आहेत. तसेच नवी मुंबईतही आम्ही खाते उघडले आहे. यापूढेही आमची अशीच घोडदौड सुरू राहिल”.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत आम्ही खूप चांगली लढत दिली आहे. येथे निवडणुकीपूर्वी शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या बऱ्याच माजी नगरसेकांना विरोधकांनी त्यांच्याकडे घेतले. तरीही आम्ही येथे चांगले लढलो आहोत. शिवसनेच्या (उबाठा) ६५ तर मनसे ०६ ठिकाणी विजयी झाली आहे.
ठाण्यात एकही जागा नाही-
ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेनेचे ७५ उमेदवार विजयी झाले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे आणि मनसेचे येथे एकही उमेदवार जिंकू शकला नाही. याबद्दल शर्मिला ठाकरेंना विचारले असता त्या म्हणाल्या, “ठाण्यात एकनाथ शिंदे असल्याने त्यांनी आमच्या काही उमेदवारांचे अर्ज विनाकारण रद्द केले. तिथे आमचे उमेदवार आणि कार्यकर्ते पळविले”.
