Mumbai CNG Price Hike details : महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ केली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून, त्यामुळे इनपुट गॅस खरेदीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.

सीएनजीचे नवे दर काय?

या ताज्या दरवाढीनंतर, १ नोव्हेंबरपासून सीएनजीचा दर ९० रुपये प्रति किलो होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात MGL ने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे देशांतर्गत उत्पादित गॅस आणि आयात केलेल्या रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस (RLNG) च्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली आहे, कारण हे दोन्ही दर आंतरराष्ट्रीय मानकांशी जोडलेले आहेत. कंपनीने खरेदी खर्च वाढण्यामागे देशांतर्गत गॅसच्या वाटपात झालेली कपात आणि जास्त किमतीच्या स्त्रोतांवर वाढते अवलंबित्व हे देखील कारण असल्याचे सांगितले आहे.

ऑटो-रिक्षा, टॅक्सी चालकांना फटका

MGL ने स्पष्ट केले की, या दरवाढीचा उद्देश इनपुट गॅसच्या वाढलेल्या खर्चाची अंशतः भरपाई करणे आणि ग्राहकांना सीएनजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करणे हा आहे. नवीन दर ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले. या ताज्या दरवाढीचा फटका मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) MGL कडून सीएनजी पुरवठा होणाऱ्या सुमारे १२.९३ लाख वाहनांना बसेल. यामध्ये ऑटो-रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने आणि राज्य तसेच महानगरपालिका प्रशासनातर्फे चालवली जाणारी सार्वजनिक वाहतूक वाहने समाविष्ट आहेत.

यापूर्वी MGL ने १ ऑक्टोबरपासून सीएनजीचे दर १ रुपयाने वाढवून ८९ रुपये प्रति किलो केले होते, त्यानंतर महिनाभराने ही नवीन वाढ झाली आहे. त्याआधी सप्टेंबरमध्ये कंपनीने प्रति किलो २ रुपयांनी वाढ करून दर ८८ रुपये केला होता. मे महिन्यात देखील MGL ने सीएनजीचे दर ८६ रुपये प्रति किलो आणि पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) चे दर ५२ रुपये प्रति स्टँडर्ड क्युविक मीटर (SCM) असे सुधारित केले होते. MGL ने म्हटले आहे की, नैसर्गिक वायूचा एक स्वच्छ इंधन पर्याय म्हणून प्रसार करत असतानाच, खरेदी खर्च कमी करण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेणे कंपनी सुरूच ठेवेल.