Mumbai Coastal Road BMW Car Accident : मुंबईमध्ये आज (२० सप्टेंबर) एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईमधील कोस्टल रोड मार्गावर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास एका बीएमडब्लू कारचा अपघात झाला. या अपघाताच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये कोस्टल रोडवरील या कारच्या अपघाताची घटना दिसत असून अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारे हे दृश्य आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
मुंबईतील कोस्टल रोड मार्गावर रविवारी पहाटे घडलेल्या कारच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाची कार भरधाव वेगाने येताना दिसत आहे आणि थेट फ्लायओव्हरवरून खाली कोसळताना दिसत आहे. ही कार अंदाजे ४० ते ५० फूट खाली कोसळताना दिसत आहे. हा व्हिडीओ अक्षरश: काळजाचा थरकाप उडवणारा आहे. या घटनेत कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.
तसेच या घटनेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ही घटना नेमकं कशी घडली? कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला का? याची आता पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Visuals from the spot following a fatal accident on the Coastal Road near Lotus Jetty. According to the BMC, an overspeeding BMW heading towards Haji Ali from Marine Drive crashed, leaving three dead and one critically injured. pic.twitter.com/Oj8MSiKH9n
— ANI (@ANI) September 20, 2026
दरम्यान, या अपघाताच्या घटनेतील कारची परिस्थिती पाहून हा अपघात किती भीषण होता, हे दिसून येत आहे. या घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शानय गज्जल (२१) आणि धिर्या सेठ (१७) यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तसेच आणखी एकाचाही मृत्यू झाला, तर २० वर्षीय तरुणाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
