Mumbai Police news on Dating App Scam: एकटेपणा, जोडीदाराची गरज किंवा प्रेयसी-प्रियकराच्या शोधासाठी हल्ली डेटिंग ॲप वापरण्याचे प्रमाण सर्रास वाढले आहे. खासकरून ३० ते ५० वयोगटातील पुरुष अशा ॲपवर जोडीदाराच्या शोधात असतात. नेमकी हीच बाब दिल्लीतील शोएब आणि अझीम सिद्दीकीने हेरली. पुरुषांच्या मानसिकतेचा अचूक वापर करत त्यांना तरुणींच्या नावाने डेटिंग ॲपवर खाती उघडायची. सुरुवातीला चॅटिंग, मग ओळख वाढवून भेटीसाठी बोलवायचे आणि मग त्यांना लुटायचे, असे फसवणुकीचे मोठे रॅकेट मुंबईत कार्यरत होते. मात्र मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे रॅकेट आता उघड झाले असून अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
इंडियन एक्सप्रेसचे प्रतिनिधी मनिष पाठक यांनी या प्रकरणाचे वार्तांकन केले असून त्यावर हा लेख आधारित आहे.
पुरुषांना कसे लक्ष्य केले जात होते?
पंकज यादव (३८) नामक तरुणाची डेटिंग ॲपवरुन महिमा नावाच्या तरुणीशी ओळख झाली. डेटिंग ॲपवरुन त्यांनी व्हॉट्सॲपचा नंबर घेतला. काही दिवस चॅटिंग आणि मग कॅफेमध्ये भेट घेण्याचा निर्णय झाला. पंकज यांनी सांगितले की, १४ मार्च रोजी ठरल्याप्रमाणे सायंकाळी मी साकीनाका येथे पोहोचलो. महिमा तिथे आली होती. स्मितहास्य करत तिने मला तिची ओळख सांगितली. “इथून जवळच एक कॅफे आहे. आपण तिथे जाऊ”, असे महिमाने सांगितल्यावर माझ्या कारमधून आम्ही तिथे गेलो.
साकिनाक्याचा कॅफे, लुटीचा पिंजरा
पाच फुटांपेक्षा थोडी उंच, गोरी आणि आकर्षक दिसणारी १८ वर्षांची महिमा पहिल्या नजरेत डोळ्यात भरेल अशी होती. तिचे चेहऱ्यावरील हावभावही मनमोहक होते. क्लब कॅफेजवळ आम्ही पोहोचलो. कॅफेत मोठ्या आवाजात बॉलिवूडची गाणी वाजत होती. पंकजने सांगितले की, कॅफेमध्ये मंद प्रकाश आणि भडक अशी सजावट होती. छताला अनेक पंखे होते. बाजूला एसी सेक्शन होता, जिथे बसण्यासाठी छोट्या छोट्या खोल्या होत्या. गर्दीने भरलेल्या या शहरात जोडप्यांना निवांत वेळ घालवण्यासाठी ही छान जागा होती.

पंकजने सांगितले की, कॅफेच्या एका कोपऱ्यात कर्मचारी आणि एका ग्राहकात वाद सुरु असल्याचे दिसले. पंकजने या खोल्यात बसण्यासाठी महिमाला आग्रह केला. पण तिला एसीत बसायचे नव्हते. म्हणून आम्ही बाहेरच बसलो.
दोघंही एका टेबलाजवळ बसल्यानंतर सुरुवातीला हलक्याफुलक्या गप्पा झाल्या. पंकज म्हणाला की, महिमाने मला माझ्याबद्दल, कुटुंब आणि व्यवसायाबद्दल प्रश्न विचारले. मी बोलत असताना ती अधूनमधून तिच्या फोनवर काहीतरी टाइप करत होती. त्यानंतर तिने तिच्यासाठी ऑर्डर दिली. मग एकामागून एक टकिला शॉट्स टेबलवर आले. अर्ध्या तासात तिने सहा शॉट्स रिचवले. याबरोबरच क्रिस्पी व्हेजिटेबल्स, फ्रेंच फ्राइज आणि एक सिगारेटचे पाकिटही तिने मागितले. मी मात्र एनर्जी ड्रिंकवर समाधान मानलं होतं.
अर्ध्या तासात १८ हजार रुपयांचे बिल
टेबलवर बसून ४० मिनिटं होताच कॅफेचा मॅनेजर आला आणि त्याने पंकज व महिमाला बोलत असताना थांबवले. तुमचे बिल १५ हजारांच्या वर गेले आहे. नेमके सांगायचे तर १८,६१६ रुपये बिल झाले असून तुम्हाला ते ताबडतोब भरावे लागेल. कॅफे मॅनेजर बोलत असताना महिमा तिथून उठली आणि आईला फोन करायचा आहे, असे सांगून तिथून निघाली. पंकजने तिला बिल भरेपर्यंत थांब असे सांगितले.
पंकजने बिल तपासले तर त्याचे डोळेच फिरले. एका टकिला शॉटसाठी कॅपेने ३००० रुपये आकारले होते. सिगारेटच्या पाकिटासाठी एक हजार रुपये लावले होते. ज्यातील फक्त एकच सिगारेट तिने ओढली होती.

…आणि खेळ खल्लास
महिमाने मेसेज केल्यानंतर आता पंकजची वेळ होती. पंकजनेही मोबाइल काढून एक मेसेज केला आणि काही सेकंदात पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर आणि साध्या कपड्यात बाहेर उभी असलेली त्यांची टीम आत आली. त्यांनी सर्व कर्मचारी आणि ग्राहकांना जिथे आहेत, तिथेच थांबण्याची सूचना केली.
पंकज हा पीडित नव्हता तर कॅफेतील रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एक सावज असल्याचे आता उघड झाले. पंकज यादवला या स्कॅमची आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याने आणि मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे याचा भांडाफोड करण्यासाठी सापळा रचला होता. विशेष म्हणजे, महिमाने जे टकिला शॉट्स मागितले होते, ते मद्य नसून पाणी होतं.
पंकजच्या ओळखीतल्या एका व्यक्तीची अशाच प्रकारे फसवणूक झाल्यानंतर त्याने युवा प्रतिष्ठान या त्याच्या एनजीओच्या माध्यमातून डेटिंग स्कॅम उघड करण्याचा निर्णय घेतला. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यादव युवकांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवेची जाणिवा जागृत करण्याचे काम करतात.
रॅकेट कसे चालत होते?
पंकज यादव यांनी झोन १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी मदत घेतली. नलावडे यांनी पोलीस निरीक्षक बंडगर यांच्या नेतृत्वाखाली १५ जणांची टीम तयार केली. याच पथकाने कॅफेत धाड टाकली. पंकज यादव कॅफेत गेल्यानंतर तिथे कर्मचारी आणि ग्राहकात वाद सुरू होता. तो ग्राहकही अशाच स्कॅमचा बळी होता. त्याच्याकडून कर्मचारी २५ हजार रुपये वसूल करत होते. हा ग्राहक रिअल इस्टेट व्यावसायिक असून ठाण्याहून तरुणीला भेटायला आला होता. कॅफेतील बाऊन्सर मोहसीन खान (२८) आणि मयांक कटारिया (२०) त्याला धमकावत होते. या दोघांबरोबरच मयूर दिडोरिया (२७), नितेश आंडसकर आणि जतीन कुमार (२४) हे कॅफेतील कर्मचारीही या रॅकेटचा भाग असल्याचे चौकशीतून समोर आले.
महिमा प्रमाणेच ठाण्यातील ग्राहकालाही एका तरुणीने या कॅफेत आणून पाण्याचे टकिला शॉट्स रिचवले होते.
महिमाची चौकशी केली असता ते तिचे खरे नाव नसल्याचे लक्षात आले. दिल्लीची ही तरुणी अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये सध्या राहते. पोलिसांनी महिमा आणि आणखी एका तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शोएब आणि अझीम सिद्दीकीचा उल्लेख केला. हे दोघेही रॅकेटचे मास्टरमाईंड असून त्यांनीच तरुणींना मुंबईत आणल्याचे समोर आले.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, डेटिंग ॲपद्वारे पुरुषांना झाळ्यात ओढून लुटण्याची कल्पना शोएब आणि अझीमचीच होती. या प्रकरणी आता १३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साकीनाका येथील धाडीदरम्यान ११ जणांना अटक करण्यात आले. तसेच पोलीस कॅफेतील सीसीटीव्ही, आरोपींचे मोबाइल तपासत असून आणखी पीडितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
तरुणींना मिळायचे पर क्लाइंट १००० रुपये
पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये १८ ते २४ वयोगटातील २० ते २५ मुली गुंतल्या आहेत. त्यांना दिल्लीहून मुंबईत आणले गेले. मुंबई शहराची फारशी कल्पना नसलेल्या या मुलींना एका हॉटेलमध्ये ठेवले जाते. जेव्हा त्यांचे लक्ष्य भेटण्यासाठी तयार होते, तेव्हाच त्यांना हॉटेलबाहेर पडण्याची परवानगी आहे. तसेच डेटिंग ॲपवर या तरुणी चॅटिंग करत नव्हत्या, ही बाबही चौकशीत समोर आली. कुशवाहा नावाचा आरोपी तरुणींच्या वतीने पुरुषांशी चॅटिंग करायचा. तोच पुरुषांना कॅफेत भेटायला बोलवायचा आणि तिथे एका तरुणीला पाठवले जायचे.
पोलिसांनी पुढे म्हटले की, तरुणींना प्रत्येक भेटीसाठी १००० रुपये दिले जात होते. काही मुलींना एका दिवसांत एकापेक्षा अधिक भेटींचे लक्ष्य असे. या रॅकेटची व्याप्ती मोठी असली तरी आतापर्यंत १५ तक्रारी समोर आल्या असून त्यापैकी फक्त सहा जणांनी जबाब नोंदविला असल्याचे पोलीस उपायुक्त नलावडे यांनी सांगितले.
