Ambernath Doctor Wife Suicide Dowry Harassment Mumbai News: महाराष्ट्र पुढारलेले राज्य असल्याचे बोलले जात असले तरी याच राज्यात हुंडाबळीसारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. मुंबईनजीक असलेल्या अंबरनाथ येथे याप्रकारची एक धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्यानंतर पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. लग्न झाल्यानंतर अवघ्या ४८ दिवसांत विवाहितेने स्वतःचे आयुष्य संपवल्यानंतर तिच्या माहेरच्या कुटुबियांना मोठा धक्का बसला असून त्यांनी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेचे नाव विशाखा तिळकर असून त्या मुळच्या पुण्यातील होत्या. त्यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले होते. ३० एप्रिल रोजी त्यांचा अंबरनाथमधील डॉ. नितीन तिळकरशी विवाह झाला. लग्नाच्या अवघ्या ४८ दिवसांतच त्यांनी आत्महत्या केली.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, विशाखाच्या कुटुंबियांनी पती आणि सासरच्या लोकांवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. हुंडा आणण्यासाठी सासरचे लोक वारंवार छळ करत होते. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
पूर्ण घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे
हुंड्याच्या आरोपासह विशाखा यांच्या कुटुंबियांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. विशाखावर सतत नजर ठेवण्यासाठी डॉ. नितीनने घरात आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. यातून विशाखा यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असे. चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे विशाखा यांना शेजाऱ्यांशी बोलण्यापासून मनाई करण्यात आली होती. त्यांना घरात कोंडून घेण्यास भाग पाडले जात असे.

विशाखा यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी विशाखा यांनी शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी संवाद साधल्यानंतर वाद उफाळला. डॉ. नितीनने घरी आल्यानंतर विशाखा यांना मारहाण केली, असा आरोप केला गेला आहे.
पालकांना फोनवरून दिली माहिती
पतीने मारहाण केल्यानंतर विशाखा यांनी आपल्या आई-वडिलांना फोन करून याची माहिती दिली होती, असेही घरातल्या लोकांनी सांगितले आहे. यानंतर त्यांचे कुटुंबिय पुण्याहून अंबरनाथला येऊन सासरच्या मंडळीबरोबर बैठक घेण्याची तयारी करत होते. मात्र ते अंबरनाथला येण्यापूर्वीच मंगळवारी विशाखा यांनी आत्महत्या केली.
या घटनेनंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नितीन यांना अटक केली आहे. तसेच सासू छाया आणि दीरावरही हुंड्यासाठी त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.
लग्नानंतर ५० ग्रॅम सोने देण्याची मागणी
विशाखा यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या वेळी कोणताही हुंडा देण्यात आला नव्हता. मात्र लग्नानंतर तिळकर कुटुंबियांनी लगेचच त्यांच्यावर ५० ग्रॅम सोने देण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा यांचे वडील पुण्यात रिक्षा चालवतात. त्यांना ही मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात महागड्या भेटवस्तू आणल्या नाहीत, याबद्दल सासरच्या लोकांकडून विशाखा यांना वारंवार टोमणे दिले जात होते. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.
