मुंबई ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची कारवाई सुरू असतानाचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या टीका करण्याचं सत्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरूच ठेवलं आहे. फ्लेचर पटेल कोण? त्यांचा वानखेडेंशी काय संबंध, पटेलसोबत फोटोतली लेडी डॉन कोण? असे अनेक सवाल मलिक यांनी उपस्थित केले आहेत. त्यांच्या याच प्रश्नांना आता वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

टीव्ही ९ने दिलेल्या वृत्तानुसार, यास्मिन वानखेडे म्हणाल्या की, कॅबिनेट मंत्री असं आधार नसलेलं विधान करत आहेत. कोणतंही वक्तव्य करण्याआधी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय पदाचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला.

हेही वाचा – “त्यांना का मिरच्या झोंबल्यात हे तर…” नवाब मलिकांच्या आरोपांना फ्लेचर पटेलचं प्रत्युत्तर

यास्मिन पुढे म्हणाल्या, “कुणाला बदनाम करण्याचं काम आम्ही करत नाही. जे चांगलं काम करत आहेत. त्यांना बदनाम करु नका. नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला जाईल तसंच, कायदेशीर नोटीस पाठवली जाईल.

दरम्यान फ्लेचर पटेल यांनीही नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबद्दल पटेल म्हणाले, “आज जर आम्ही एनसीबीचे योद्धा झालो आहोत तर नवाब मलिकांना काय मिरच्या झोंबल्या आहेत हे प्रवीण दरेकर आणि फडणवीसांनी सांगितलंच आहे. तेव्हा मी मलिकांना विनंती करतो की विनाकारण कोणत्याही सैनिकाचं नाव घेऊ नका. माझा नंबर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे तुमचे कार्यकर्ते आहेतच. तुम्ही मला बोलावूही शकता, तुम्ही मोठे मंत्री आहात. पण कोणत्याही सैनिकाला किंवा गणवेशधारी अधिकाऱ्याला त्यांची कामाप्रती सचोटी दाखवण्यासाठी आपल्या परवानगीची गरज नाही. तुम्ही जर खरंच ड्रग्जच्या विरोधात आहात तर समोर या आणि आमच्या मोहिमेला पाठिंबा द्या. आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करा. मी तुमच्याच भागात तुम्हाला दाखवतो की कुठे कुठे काय काय सापडतंय”.