मुंबई : उन्हाच्या तप्त झळा सुसह्य करणारी वातानुकूलित यंत्रणा, कुलर, पंखे यांचा वापर वाढल्याने मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत तर अवघ्या आठवडाभरात वीजमागणीत १५ ते १७ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास विजेच्या मागणीत आणखी भर पडेल, असा अंदाज आहे.

यंदा मार्च-एप्रिलमध्ये पाऱ्याने मोठी उसळी घेतल्याने मुंबईसह राज्यात विजेचा वापर वाढून अनेक नवीन विक्रम प्रस्थापित झाले. मार्चमध्येच विजेची मागणी ३० हजार मेगावॉटच्या पुढे नोंदवली गेली. तर मुंबईची दिवसाची मागणी सुमारे साडेतीन ते चार हजार मेगावॉटपर्यंत पोहोचली होती. तापमान जसजसे उतरू लागले तशी वीजेची मागणीही कमी झाली. मात्र आठवडाभरात राज्यभर तापमानाने मोठी उसळी घेतल्याने विजेची मागणीही वाढली आहे.

मुंबईत ८ एप्रिलला सकाळच्या (दहा ते बारा वाजण्याच्या) सुमारास ३,४५९ मेगावॉट इतकी वीजमागणी होती. ती १५ एप्रिलला सुमारे १५ टक्क्यांनी (४,०६४ मेगावॉट) वाढली. सायंकाळपर्यंत वीजमागणीतील वाढ ५ ते ७ टक्क्यांपर्यंत खाली आली. मात्र पहाटे चारच्या सुमारास पुन्हा १७ टक्के इतकी वीजमागणी वाढ नोंदवली गेली.

राज्यात मुंबई वगळता इतरत्रही वीजमागणीत दिवसभरात ५ ते १० टक्के इतकी वृद्धी नोंदवली गेली. आठवडाभरापूर्वी राज्यभरात सकाळच्या सुमारास २२,९४२ मेगावॉट इतकी वीजमागणी होती. ती १५ एप्रिलला ४ टक्क्यांनी वाढून २३,९९२ मेगावॉटवर गेली. तर सायंकाळी पाचच्या सुमारास वीजमागणीतील वाढ पुन्हा १० टक्क्यांच्या आसपास नाेंदवली गेली. यावेळेस दिवसभरातील सर्वाधिक म्हणजे २५,०१८ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली. मागणी वाढली असली तरी भारनियमन कुठे करावे लागलेले नाही.

मुंबईत टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी, आणि बेस्ट यांकडून प्रामुख्याने वीज पुरवठा केला जातो. तर उर्वरित महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) वीज पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात शेतीसाठी कृषीपंपांचा वापर वाढला आहे. या शिवाय वातानुकूलित यंत्रणा, कुलर, पंखे यांचाही वापर वाढतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणच्या विजेची मागणी वाढली आहे.

पाच वर्षात विक्रमी वाढ

साधारण पाच वर्षांपूर्वी एप्रिल व मे महिन्यांत राज्यातील वीजमागणी २१ हजार मेगावॉटच्या आसपास सीमित असे. तर मुंबईत ती २,२०० मेगावॉटदरम्यान असे. त्यात आता विक्रमी वाढ झाली आहे. राज्यात विजेच्या मागणीने ३० हजार मेगावॉटचा विक्रम प्रस्थापित केला आहे. तर २२ मे, २०२४ रोजी मुंबईत ४,३०६ मेगावॉट इतकी विक्रमी वीजमागणी नोंदवली गेली. गेल्या वर्षी तर ती ४,४४० मेगावॉटवर पोहोचली होती.