Mumbai family deaths mystery Watermelon : मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूचे गूढ अधिक गडद झाले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या प्राथमिक संशयानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या चाचणीत कलिंगड किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डोकाडिया कुटुंबाने शनिवारी (२३ एप्रिल) रात्री बिर्याणी खाऊन कलिंगड खाल्ला होता. रात्री उशिरा कलिंगड खाऊन हे कुटुंब झोपी गेले. मात्र, रविवारी (२४ एप्रिल) पहाटेपासून चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे यावर उपचार केले. मात्र, डॉक्टरांनी लागलीच जे. जे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करायला सांगितले. मात्र, उपचारांदरम्यान, चौघांचाही एकापाठोपाठ एक चौघांचाही मृत्यू झाले. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली. ऐन कलिंगड मोसमात कलिंगडमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कलिंगडसहित इतर अन्नपदार्थांची तपासणी केली.

कलिंगडवर कोणताही रासानयिक द्रव्यांचा अंश नाही

एफडीएने कलिंगड, भात, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी केली. यामध्ये कृत्रिम रंग किंवा गोडवा वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. मात्र, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा इतर विषांची शक्यता अद्याप नाकारता येत नाही.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विश्लेषणाची व्याप्ती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अशा चाचण्या केवळ एखादे उत्पादन त्याच्या अपेक्षित रचनेशी जुळते की नाही आणि त्यात भेसळ आहे की नाही, हे ओळखण्यापुरत्याच मर्यादित आहेत. त्यांनी असंही नमूद केलं की जिवाणूजन्य संसर्ग किंवा इतर विषारी पदार्थांची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्या चाचण्या घेण्यात आल्या नव्हत्या.

अवयव हिरवे पडले

दरम्यान, प्राथमिक न्यायवैद्यक तपासणीत असे समोर आले आहे की, मृत व्यक्तीचे मेंदू, हृदय आणि आतडे हे महत्त्वाचे अवयव हिरवे झाले होते. तज्ञांच्या मते, ही स्थिती सामान्य अन्न विषबाधेपेक्षा वेगळी आहे. जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये असे बदल दिसून येतात, एखादा विषारी पदार्थ संपूर्ण शरीरात पसरल्याचे हे लक्षण आहे. याव्यतिरिक्त, सूत्रांनुसार, अब्दुल्लाच्या शरीरात मॉर्फिनचे अंशही आढळले आहेत.

मॉर्फिनचे अंश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात ‘मॉर्फिन’चे अंशही सापडले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. पाण्याचे नमुने अनिर्णित राहिले असून, मांसाचे नमुने पुढील तपासणीसाठी नागरी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या घटनेत अब्दुल्ला डोकडिया (४४), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि दोन मुली आयशा (१६) व झैनब (१२) यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर या कुटुंबाची प्रकृती खालावली होती. पोलीस आता फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत असून, हा घातपात आहे की काही जैविक कारण, याचा शोध घेत आहेत.