Mumbai family watermelon tragedy news update : मुंबईतील पायधुनी परिसरातून सोमवारी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आणि संपूर्ण मुंबईकरांच्या पायाखालची जमीनच सरकली. बिर्याणी खाऊन आल्यानंतर कलिंगड खाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृतांचा व्हिसेरा घेतला असून त्याचा अहवाल आल्यावर या मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येणार आहे. दरम्यान, या मृतांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले असून तपासणी अहवालाची प्रतिक्षा आहे. डोकाडिया यांच्या घरात नेमकं काय घडलं, याविषयी त्यांच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे.
माझ्या मुलाचं अख्खं कुटुंब संपलं
अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. जोगेश्वरी येथे राहत असलेल्या अब्दुला यांच्या आईची अवस्था अत्यंत बिकट होती. त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाचं अख्खं कुटुंब संपलं यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मागच्याच आठवड्यात मी त्यांना भेटले होते आणि नातींसोबत खेळले होते. मोठी मुलगी दहावीत होती, तर धाकटी आठवीत. मी आता जास्त बोलण्याच्या स्थितीत नाही”, असे म्हणत त्यांना रडू कोसळले. “मला पाच मुलगे आणि दोन मुली आहेत. माझा एक मुलगा आता राहिला नाही”, असे त्यांनी पुढे सांगितले.
रविवार असल्याने उशिरा उठणार होते, पण…
तर, अब्दुल्ला यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं की, शनिवारी (२५ एप्रिल) अब्दुल्ला, नसरीन आणि त्यांच्या दोन मुली जेवायला बाहेर गेले होते. मला शॉपिंगला जायचं असल्याने मी जाऊ शकले नाही. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी बिर्याणी खाल्ली. रात्री पावणे बाराच्या सुमारास ते घरी परतले. तोपर्यंत सर्व व्यवस्थित होतं. त्यानतंर रात्री १ ते दीडच्या सुमारास मुलांना भूक लागली. त्यामुळे अब्दुल्ला आणि नसरीन यांनी कलिंगड कापला आणि त्या चौघांनी मिळून खालला. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ते उशिरा उठणार होते. पण पहाटेच आम्हाला फोन आला की त्यांना उलट्या आणि जुलाब होत आहेत. आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. आता ते आमच्यात नाहीत हे स्वीकारणं अत्यंत भयानक आहे.”
दरम्यान, डोकाडिया कुटुंबाला अस्वस्थ वाटत असल्याचं समजल्यावर शेजाऱ्यांनी त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत असलेल्या डॉ. कुरेशी यांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी परिस्थिती पाहून प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. लहान मुलगी झैनबचा रविवारी सकाळी १०:१५ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशाही उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. थोड्या वेळाने त्यांचाही मृत्यू झाला. रात्री १०.३० वाजता कुटुंबातील प्रमुख अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अब्दुल्ला यांचा चुलत भाऊ मोहम्मद मुस्तफा इक्बाल यांनी सांगितले की, कुटुंब आता त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे याचा शोध घेत आहे. सर्व पाहुण्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती. पण याच कुटुंबाने कलिंगड खाल्ला होता. त्यामुळे आम्हाला संशय आहे की तेच मृत्यूचं कारण असू शकतं. त्यासाठी आम्ही आता न्यावैद्यक (फॉरेन्सिक) आणि शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. या अहवालाला किमान १५ दिवस लागू शकतात.” ते पुढे म्हणाले, “अफवांकडे दुर्लक्ष करा. पोलिसांनी आम्हाला माध्यमांशी जास्त न बोलण्याचं सूचना दिल्या आहेत. कारण कलिंगड खाऊन ९ जणांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे, ते सत्य नाही.”
हे कुटुंब पायधुनी येथील ‘वलक हलाल मेमन जमात’ या परिसरातील ‘वलक हलाल मेमन जमात’मध्ये दुसऱ्या मजल्यावर १-बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास चार पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने पुन्हा इमारतीची पाहणी केली. “आम्ही तपासाचा भाग म्हणून शेजारी आणि इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहोत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; ते केवळ फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल. त्यासाठी किमान १५ दिवस लागतील,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, सोमवारी सकाळी ९ वाजता मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक आणि त्यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
