Mumbai Milk Price Hike update: दिवसेंदिवस महागाई वाढत जात असून अनेक दैनंदिन जिन्नसाच्या किंमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच आता दूधाच्या दरांत तब्बल ९ रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे प्रति लिटर दुधाचे दर आता शंभरी पार करणार आहे. म्हणजे थेट डेअरी फार्म किंवा गोठ्यातून ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणाऱ्या ताज्या दूध दरांत वाढ होणार आहे. हे नवे दर लागू होणार असल्याची माहिती ‘बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
‘बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (बीएमपीए) मंगळवारपासून मुंबईतील डेअरी आणि स्थानिक तबेल्यांमधून मिळणाऱ्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लीटर ९ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुधाचा घाऊक दर प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये होणार आहे. बीएमपीएच्या म्हणण्यानुसार, गुरांचा वाढलेला चारा आणि त्यांच्या देखभालीचा खर्च भागवण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.
प्रति लिटर दूधाची किंमत ११० रुपये होणार
सणासुदीच्या तोंडावर झालेली ही दरवाढ ग्राहकांना चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. तबेल्यातून थेट पुरवठा होणाऱ्या दुधाचा किरकोळ दर प्रति लीटर ११० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी दूध उत्पादक संस्था असलेल्या ‘गोकुळ’ने म्हशीच्या दुधाच्या किरकोळ दरात प्रति लीटर २ रुपयांची वाढ केली होती, यामुळे मुंबई आणि पुण्यात हा दर प्रति लीटर ७८ रुपये झाला होता. गोकुळने सांगितले होते की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली होती.
इतर ब्रॅण्डेड दूधाव्यतिरिक्त हे ताजं दूध वेगळं का असतं?
Farm-supplied milk म्हणजे थेट डेअरी फार्म किंवा गोठ्यातून ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जाणारं ताजे दूध. मोठ्या ब्रँड्सप्रमाणे हे दूध वेगवेगळ्या हजारो शेतकऱ्यांकडून गोळा करून, त्यावर प्रदीर्घ प्रक्रिया करून विकले जात नाही; तर ते एकाच विशिष्ट फार्ममधून थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजेच गाय किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर काही तासांच्या आत ते थेट ग्राहकांना वितरित केले जाते.
