दापोली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस प्रवासी उतरवण्यासाठी भरणेनाका येथे थांबली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

या धडकेत कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कार मधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. काही काळ घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. जखमींना तात्काळ बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात आले.

अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (वय ५०), जनार्दन खेराडे (वय ४०), परशुराम गुणाजी खेराडे (वय ६०, सर्व रा. संगमेश्वर) तसेच अर्जुन धोंडीबा चाळके (वय ३०, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी परशुराम खेराडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने खेड पोलिसांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे कामही हाती घेतले.

दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर जवळपास अर्धा तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आणि स्थानिकांनी प्रयत्न करून वाहतूक पूर्ववत केली.

सिलेंडरचा टँक पुढील सीटवर

अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेनंतर गाडीतील सिलेंडरचा टँक पुढील सीटपर्यंत येऊन पोहोचला होता. सुदैवाने कोणतीही स्फोटक घटना घडली नाही; अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.