रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील नातुनगर परिसरात गुरुवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणारी झायलो कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरवर आदळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नातुनगर बस थांब्याजवळ (एमएच ०८ झेड ३६९२) क्रमांकाच्या झायलो वाहनावरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. भरधाव वेगातील कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या अपघातात सबिया मारुख जसनाईक (वय ३३, रा. भोस्ते मोहल्ला) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इमरान मुरात जसनाईक (वय ४५), अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४) आणि सेहरा मारुख जसनाईक (वय ७) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धामची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तसेच जय हिंद अॅम्बुलन्स, खेड आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, वाहनाचा वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील वाढती वाहनाची संख्या बघता या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. काही धोक्याच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक नाहीत तर पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आलेला नाही. मुंबई पुणे या भागातून येणा-या वाहनांचा वेग ही जास्त असतो. तसेच झोप न मिळाल्याने असे वारंवार अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे.
