रत्नागिरी :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे बुधवारी १५ जुलै पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हा अपघात सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास लांजा शहरातील शांतीनगर परिसरात, सरकारी विश्रामगृहाच्या पाठीमागे सुमारे ३०० फूट अंतरावर घडला. एमएच ०१ सीपी ८०२१ क्रमांकाची क्रेटा कार एमएच ०५ ईएल ३८७७ क्रमांकाच्या डंपरवर मागून आदळली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा पुढील भाग डंपरच्या मागील भागात घुसला आणि वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. त्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

या अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कदम, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि पोलीस उपनिरीक्षक रेवने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे. मृत आणि जखमींची अधिकृत ओळख पटविण्याचे काम सुरू असून, डंपर रस्त्याच्या कडेला कोणत्या कारणामुळे उभा होता, आवश्यक इशारा फलक अथवा अन्य सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती का, तसेच अपघाताला नेमके कोणते कारण कारणीभूत ठरले, याचा तपास सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरील उभी वाहने, वेगमर्यादेचे पालन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.