अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे परिसरात रस्त्याबाहेर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दापोलीतील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर बाप-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरहून दापोलीकडे निघालेल्या कारने (एमएच ०८ एएन २४३९) लोहारे हद्दीत रस्त्याबाहेर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला (एमएच ०४ एलवाय १६३८) मागील बाजूस जोरदार धडक दिली. ट्रक चालक वाहन उभे करून नदीकाठी गेला असताना हा अपघात घडला.
या दुर्घटनेत कारमधील सुवर्णा अनिल मरकड (४५) व त्यांची मुलगी अनुश्री मरकड (१६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कार चालक अनिल रावसाहेब मरकड (४४) आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा चिन्मय मरकड हे गंभीर जखमी झाले. अनिल मरकड यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे, तर चिन्मयला महाड येथे हलविण्यात आले आहे.
अनिल मरकड हे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी असून त्यांचे मूळ गाव अहिल्यानगर आहे. मृत सुवर्णा मरकड या दापोली येथील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचारी होत्या.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांच्यासह पोलीस पथक तसेच नरवीर व काळभैरवनाथ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी घटनास्थळ व ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
