रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढलेली असतानाच लांजा आणि आरवली परिसरात अपघातांची मालिका घडली आहे. वाकेड पुलावर वॅगनआर कारने ट्रिबर कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिघे जखमी झाले. तर आरवलीजवळ खेरशेत-कासे फाटा येथे एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस पुढील सोळा टायर ट्रकवर आदळली. या अपघातात एसटी बसचा पुढील भाग अक्षरशः चकाचूर झाला असून, एक प्रवासी जखमी झाला आहे.

मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रिबर कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड पुलावर शनिवारी सकाळी सुमारे ६.४५ वाजता हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर कार (क्रमांक एमएच ४६ एपी १९७४) मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जात होती. त्याचवेळी ट्रिबर कार (क्रमांक एमएच ४८ बीएच ८५५१) मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होती. वाकेड पुलावर वॅगनआर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वॅगनआरने ट्रिबरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. वॅगनआरमधील ध्रुव जितेंद्र मापारी (वय १६, रा. वेरली सडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) तसेच ट्रिबरमधील उत्तम परशुराम मिस्त्री (वय ६१) आणि मंगला उत्तम मिस्त्री (वय ६०, दोघेही रा. कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आरवलीजवळ एसटीचा भीषण अपघात; पुढचा भाग चक्काचूर दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीनजीक खेरशेत-कासे फाटा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला. मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी एसटी बस (क्रमांक एमएच १४ एमएच ६४५०) पुढे असलेल्या सोळा टायर ट्रकवर आदळली. एसटी बसचे ब्रेक न लागल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पुढील ट्रकला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की एसटी बसचा पुढील भाग पूर्णपणे चकाचूर झाला. त्यानंतर बसची मारुती वॅगनआरलाही पाठीमागून धडक झाली.

या अपघातात एसटीमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दुखापत झाली असून, अन्य काही प्रवाशांना मुकामार लागल्याची माहिती आहे.
अपघातामुळे वाहतूक धिम्या गतीने अपघातग्रस्त एसटी बस महामार्गावर असल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मोठ्या संख्येने वाहने निघालेली असताना महामार्गावर घडलेल्या या अपघातांमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या गर्दीत महामार्गावर वेगाचा कहर आणि वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनत असून, वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.