सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकाजवळील दुसऱ्या पुलावरून एक भरधाव वेगात असलेली कार ओहोळात कोसळल्याची घटना बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात बचावले असून, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार पुलापासून सुमारे १०० मीटर मागे डिव्हायडरवर चढली. त्यानंतर सुसाट वेगाने स्ट्रीट लाईटचा खांब तोडून सुमारे ६० फूट खोल ओहोळात कोसळली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी, कर्मचारी श्री. भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे आणि दाजी परब यांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू केले. कारमधील सावंतवाडी येथील चारही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना दिली. अपघाताच्या वेळी पाण्याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हा अपघात लगेच कोणाच्या लक्षात आला नाही.