अलिबाग, रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गाचे उर्वरीत काम मे अखेर पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरीत कामांचे प्रमाण आणि त्याची गती लक्षात घेतले तर ५० दिवसात हे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे आता आश्वासने नको उर्वरीत कामांना गती देण्याची मागणी कोकणवासियांकडून केली जात.

मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या कामाला २०११ साली सुरुवात झाली होती. २०२६ उजाडले तरी हे काम पूर्ण झालेले नाही. नागोठणे, कोलाड येथील पूलांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाला २०१४ साली सुरूवात झाली. हे कामही २०२६ एप्रिल महिना उजडला तरी पूर्ण झालेले नाही. रायगड जिल्ह्यात इंदापूर आणि माणगाव दरम्यान बाह्यवळण रस्त्यांची कामे सध्या अपूर्ण आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आरवली ते कांटे दरम्यानच्या महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. पाली, हातखंबा, संगमेश्वर दरम्यान महामार्गाच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. चिपळूण येथील उड्डाण पूलाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. परशूराम घाटातील गॅबियन वॉल्सची कामेही मार्गी लागलेली नाहीत. सध्या महामार्गाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे उर्वरीत कामे ५० दिवसात पूर्ण करणे आवश्यत असल्याचे मत कोकणवासियांकडून व्यक्त केले जात आहे.

समृध्दी मार्गाचे काम मुंबई गोवा महामार्गाच्या कितीतरी नंतर सूरू होऊन पूर्ण झाले. पण कोकणातील महामार्गाचे काम १५ वर्ष सरली तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. आता आश्वासने नको रस्ता पूर्ण करा असा सवाल व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय वाहतुक मंत्र्यांनी एकदा हेलिकॉप्टर ऐवजी महामार्गावरून गाडीने प्रवास करावा, म्हणजे त्यांच्या वस्तूस्थिती लक्षात येईल, महामार्गाचा प्रश्न आमच्यासाठी जीवन मरणाचा बनला आहे. कित्त्येक वर्ष झाली तरी काम पूर्ण झालेले नाही. जी कामे सरू आहेत ती अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. उड्डाण पूलांचे गर्डरही बसवलेले नाहीत, रस्त्यावर कामगार दिसत नाहीत. त्यामुळे महामार्गाचे ५० दिवसात पूर्ण होणे अशक्य आहे. -अशोक परब, कोकणवासीय

गडकरी साहेब कोकणात येतांना हवाई मार्गाने येण्या ऐवजी रस्ते मार्गाने आले असते, तर त्यांना मुंबई गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा अचूक अंदाज आला असता, तसेच उर्वरीत कामे किती दिवसात पूर्ण होऊ शकतील याची अचूक जाणीव त्यांना झाली असती. – रामशेठ रेडीज, सदस्य, महामार्ग संघर्ष समिती चिपळूण.