रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम ९९ टक्के पूर्ण झाल्याचे दावे करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभाग  आणि सत्ताधारी नेत्यांच्या दाव्यांची पहिल्याच पावसाने अक्षरशः पोलखोल केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले असून, लांजा आणि संगमेश्वर परिसरात नागरिकांना चिखलातून वाट काढण्याची वेळ आली आहे. दुचाकीस्वारांसाठी तर हा महामार्ग जीवघेणा ठरत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आरवली ते तळेकांटे दरम्यान महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबतचे नियोजन पूर्णपणे फसल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोलगट राहिल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेली गटारे, आउटलेट किंवा जलवाहिन्यांची कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.

महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे ढोल वाजवणाऱ्या यंत्रणांनी तांत्रिक बाबींवर किती दुर्लक्ष केले, याचे जिवंत उदाहरण पहिल्याच पावसात समोर आले आहे. १७ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाकडून कोकणवासीयांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, काम पूर्णत्वाकडे जात असतानाही मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.

गेल्या वर्षीही याच भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करत परिस्थिती हाताळली होती. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे यंदाच्या पहिल्याच पावसाने स्पष्ट केले आहे.

 पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना रस्त्यावर फूटभर पाणी साचत असेल, तर मुसळधार पावसाच्या काळात परिस्थिती किती गंभीर होईल, याची भीती वाहनचालक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालकांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने पाण्यात अडकत आहेत. त्यातच, मोठ्या वाहनांच्या वेगामुळे गढूळ पाणी दुचाकीस्वार आणि लहान वाहनांवर उडत असल्याने वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.

“१७ वर्षे प्रतीक्षा करूनही जर निकृष्ट दर्जाचे कामच मिळणार असेल, तर कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका खर्च झाला कुठे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करणारे अधिकारी आणि नेते आता या परिस्थितीवर काय उत्तर देणार, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

पहिल्याच पावसात महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी प्रशासन तात्पुरत्या उपाययोजनांवर समाधान मानणार की कायमस्वरूपी तोडगा काढून नागरिकांना दिलासा देणार, याकडे संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

मुंबई गोवा महामार्गामुळे होणारी डोके दुखी अजून कमी होण्याचे नाव घेत आहे.  रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे  चिखलातुन मार्ग काढावा लागत आहे. अपघात ही होत आहेत. हा रस्ता कधी पुर्ण होणार याचीच आम्हाला प्रतिक्षा आहे. – संजय लांजेकर, नागरिक लांजा.