मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन १५ वर्षे उलटली तरी हा मार्ग कधी पूर्ण होणार याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. माणगाव आणि इंदापूर बाह्यवळण मार्ग यंदाही पूर्ण होणार नाही. यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याने यंदा गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी वाहतूककोंडीचे विघ्न कायम आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीसंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठक घेतली. या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याचे काम त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माणगाव आणि इंदापूर बाह्यवणळ मार्ग (बायपास) गणेशोत्सवाआधी पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. बाह्यवळणाचे काम सुरू असले तरी मागणावमधी रेल्वे पूल आणि नदीपुलाचे काम होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. इंदापूर बाह्यवळण मार्गावरील एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न असून तसे झाल्यास निदान इंदापूरमधील वाहतूककोंडीला वाहनचालकांना चुकवता येणार आहे.

चार उड्डाणपूलांचे काम मार्गी

लांजा, कोलेटी, संगमेश्वर तसेच निवळी येथील उड्डाणपुलांचे काम गणेशोत्सवाआधी मार्गी लागणार असल्याने कोकणवासीयांना दिलासा मिळणार आहे. संगमेश्वर येथे प्रगतीपथावर असून हे सुरू असलेले काम गणेशोत्सवाआधी पूर्ण होणार आहे. पावसामुळे कामात अडथळा येत असला तरी ते पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे खेड येथे खचलेल्या भागाचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भोस्ते घाटाचे कामही वेगाने मार्गी लावले जात आहे. महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते खड्डे गणपतीपूर्वी बुजवून गणेशभक्तांचा मार्ग सुकर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिले.

नागोठणे उड्डाणपूल बंदच राहणार

मुंबई-गोवा महामार्गावरील रायगडमधील नागोठणे येथील उड्डाणपूल सुरू करण्यात आला. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांत या पुलाला तडे गेले तसेच हा पूल खचला. हा पूल गणपतीपूर्वी होणे शक्य नसून आयआयटीने अहवाल दिल्यानंतरच या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र या भागात खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने येथून वाहन चालवणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे ठरत आहे.