राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन गमावलेल्या भूसंपादनग्रस्तांना अद्याप पूर्ण मोबदला न देता त्यांच्यावर टोलच्या माध्यमातून आर्थिक बोजा टाकणे अन्यायकारक असल्याचा आरोप करत, प्रलंबित भरपाई तातडीने द्यावी आणि स्थानिक नागरिकांना टोलमाफी जाहीर करावी, अन्यथा टोलनाका सुरू होऊ देणार नाही, असा थेट इशारा आमदार किरण सामंत यांनी दिला आहे.

तालुक्यातील हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हजारो शेतकरी व जमीनधारकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. अनेकांनी विकासाच्या दृष्टीने स्वेच्छेने जमीन दिली; मात्र आजही अनेकांना पूर्ण मोबदला मिळालेला नाही. काही प्रकरणे रखडलेली असून अपूर्ण भरपाईबाबतही तक्रारी पुढे येत आहेत.

अशा स्थितीत हातिवले येथील टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींना स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत आहे.वाहनचालक व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी करणारी निवेदनेही सादर केली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट व आक्रमक केली आहे.

“रोजगार, शिक्षण, व्यवसाय व आरोग्य सेवांसाठी स्थानिक नागरिकांना दररोज महामार्गाचा वापर करावा लागतो. अशा वेळी त्यांच्यावर टोलचा अतिरिक्त भार टाकणे योग्य नाही. हा लढा राजकारणासाठी नसून सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, “मतदारसंघातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला. आमदार सामंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन आता कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.