अलिबाग- मुंबई गोवा महामार्गाचे काम ३१ मे अखेर पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना खासदार नारायण राणे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यात दिली होती. पण ३१ मे उलटून जून महिना सूरू झाला तरी महामार्गाचे उर्वरीत काम काही मार्गी लागू शकलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोकणवासीयांचा प्रवास काही प्रमाणाात गैरसोयीचाच राहणार आहे.
महामार्गाच्या कामाची रखडपट्टी कशी?
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला २०११ साली सुरूवात झाली होती. हे काम २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२६ उजाडले तरी महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. दरवर्षी मे अखेर नाहीतर डिसेंबर अखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी आश्वासने दिली जातात. मात्र रस्त्याचे काम काही पूर्ण होत नाही. न्यायालयातही दाखल याचिकांवर सुनावणी दरम्यान महामार्ग विभागाने या रस्त्याच्या कामा संदर्भात अनेक लेखी तारखांची हमीपत्र दिली. संसद आणि विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजा दरम्यान उपस्थित प्रश्नांना उत्तरे देतांना लवकरच हे काम पूर्णत्वाला जाईल अशी उत्तरे देण्यात आली पण महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
गडकरी यांनी काय आश्वासन दिलं होतं ?
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच एक अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. या समारोहात बोलतांना गडकरी यांनी दिर्घकाळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम ३१ मे अखेर पर्यंत पूर्ण होईल, आणि या कामामुळे माझ्यावर खूप टिका झाली आहे. त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले तरी उद्घाटनालाही येणार नाही, असे स्पष्ट केले होते.
महामार्गाची सद्यस्थिती काय ?
पण गडकरी यांनी दिलेले हे आश्वासनही महामार्ग विभागाच्या संथ कारभारामुळे हवेत विरले आहे. ३१ मे ची मूदत संपली तरी महामार्गाचे काम अपूर्ण राहीले आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. कोलाड येथील पूलांचे कामे अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ, नागोठणे, कोलाड येथील सर्विस रोडची कामेही अपूर्ण आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आरवली ते कांटे दरम्यानच्या मार्गाचे काम अपूर्ण आहे. चिपळूण, संगमेश्वर येथील पूलांची कामेही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे माणगाव, इंदापूर, संगमेश्वर पट्ट्यात दैनंदीन वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सातत्त्याने सामोरे जावे लागत आहे.
महामार्गाचे काम पंधरा वर्ष रखडल्याने कोकणचे आतोनात नुकसान झाले आहे. सद्यस्थिती लक्षात घेतली तर उर्वरीत कामे अजून वर्षभर पूर्ण होतील अशी चिन्ह नाहीत. त्यामुळे जोवर संपुर्ण महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. तोवर टोल वसूली करू नये, आणि कोकणवासीयांना टोल वसूलीतून सूट द्यावी.संजय यादवराव ,कार्याध्यक्ष कोकण भूमी प्रतिष्ठान
