रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अखेर कधी पूर्ण होणार? हा प्रश्न आता केवळ कोकणवासीयांचाच नाही, तर दरवर्षी लाखो प्रवाशांच्या जिवाशी निगडित झाला आहे. तब्बल १७ ते १८ वर्षांपासून सुरू असलेले काम आजही अपूर्णच असून, पावसाने या रखडलेल्या कामाची पोलखोल केली आहे. काही ठिकाणी काम संथ गतीने सुरू आहे, तर अनेक ठिकाणी यंत्रसामग्रीच गायब झाल्याने काम पूर्णपणे ठप्प आहे.
संगमेश्वर ते लांजा या पट्ट्यातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. नुकतेच तयार झालेले रस्तेही उखडू लागले आहेत. ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, सिमेंट निघून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्यांची अशी झालेली दुर्दशा पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.
संगमेश्वर बसस्थानक चिखलाच्या विळख्यात
संगमेश्वर बसस्थानक परिसरात रस्त्याचे काम अर्धवट असल्याने चिखल, साचलेले पाणी आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांना रोजच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पायी चालणेही धोकादायक बनले असून, नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून मार्ग काढत आहेत.
आश्वासनांचा पाऊस… पण महामार्ग मात्र तसाच!
राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी “महामार्ग लवकरच पूर्ण होईल” अशी ग्वाही दिली. मात्र प्रत्येक वेळी घोषणा झाल्या, मुदती बदलल्या, पण प्रत्यक्षात रस्त्याचे चित्र बदलले नाही. कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या या प्रकल्पामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गणेशभक्तांना यंदाही हाल अपरिहार्य
अवघ्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो गणेशभक्त कोकणात दाखल होतील. मात्र अपूर्ण महामार्ग, खड्डे, वाहतूक कोंडी आणि चिखलामुळे यंदाही प्रवास त्रासदायक ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अर्धवट रस्ता… पण टोल वसुलीसाठी मात्र तयारी!
एकीकडे महामार्गाचे काम अपूर्ण असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी टोल प्लाझाची यंत्रणा सज्ज झाली आहे. ऑगस्टपासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून, “रस्ता पूर्ण नाही, मग टोल कशाचा?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोकणवासीयांची स्पष्ट भूमिका आहे की, प्रथम दर्जेदार आणि पूर्ण महामार्ग द्या, त्यानंतरच टोल वसूल करा. अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याचे मत व्यक्त होत आहे.
“१८ वर्षे झाली… अजून किती वर्षे वाट पाहायची?”
“महामार्ग कधी पूर्ण होणार?” “अर्धवट रस्त्यावर टोल वसूल करण्याचा अधिकार कोणाला?” असे अनेक प्रश्न आता कोकणवासिय विचारु लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाचा जीवनमार्ग ठरणार होता. मात्र आज तोच महामार्ग कोकणवासीयांच्या सहनशीलतेची कठोर परीक्षा घेणारा ‘अंतहीन प्रकल्प’ बनला आहे.
मुंबई गोवा महामार्ग अद्याप पुर्ण झाला नाही. बरेच वर्ष आम्ही तो पुर्ण होण्याची वाट पहात आहोत. दरवर्षी गणेश भक्त आदळत आपटत कोकणात येत असतात. यावर्षी ही हिच परिस्थिती आहे. शासनकर्त्यांनी आश्वासन न देता कामे करावीत… राजाराम लिंगायत, लांजा, रत्नागिरी.
