अलिबाग – मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव आणि बेदरकारपणे येणाऱ्या डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी काही काळ महामार्गावरील वाहतूक रोखून धरत निषेध व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य किशोर बल्लाळ (वय २२) आणि यश मुकेश बल्लाळ हे दोघेही मुंबईतील विक्रोळी येथील कन्नमवार नगर परिसरातील रहिवासी होते. ते चिपळूणहून दुचाकीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. शनिवारी रात्री सुमारे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी खारपाडा परिसरात आली असता मागून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. संतप्त जमावाने काही काळ वाहतूक रोखून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अपघाताची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक डंपरसह फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
