अलिबाग- मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आता वाढीव पथकर द्यावा लागणार आहे. महामार्गावरील खारपाडा येथील पथकरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ९५ ऐवजी शंभर रुपयांचा पथकर वाहनचालकांना द्यावा लागणार आहे. वाढीव दरांची अमंलबजावणी सुरू झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर टप्प्यात खारपाडा आणि खांब येथे पथकर नाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी खारपाडा येथील पथकर नाका दोन महिन्यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला होता. या पथकर नाक्यावर चारचाकी वाहनांसाठी ९५ रुपये इतका पथकर आकारणी केली जात होती. दोन महिन्याच्या आतच यात आता वाढ करण्यात आली आहे. पथकर ९५ रुपयांवरून १०० रुपये करण्यात आला आहे. सुधारीत पथकर दर रचनेनुसार टोल दरात प्रतीवाहन कारसाठी पाच रुपयांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे याची अमंलबजावणीही सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवाशी आणि वाहनचालकामध्ये नाराजीचा सुरू आहे.
आधीच महामार्गाचे काम अपूर्ण असतांना पथकर आकारणी सुरू केल्याने कोकणवासींयामध्या नाराजीचा सूर होता. साठ किलोमीटर परिसरात एकच पथकर नाका असणे अपेक्षित असतांना सुकेळी खिंडीत ४२ किलोमीटर अंतरावर दुसरा पथकर नाका सुरू करण्याची तयारी महामार्ग प्राधिकरणाने सुरु केली होती. यावर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आक्षेपही घेतला होता. महामार्गाची कामे पूर्ण झाल्याशिवाय पथकर वसूली करू नका अशी मागणी त्यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
कोकणातील विवीध संघटनांनी कामे अपूर्ण असतांना पथकर वसूली करू नये या मागणीसाठी आंदोलनेही केली होती. मात्र तरही खारपाडा येथील टोलनाका सुरूच ठेवण्यात आला होता. त्यामुळे नाराजी होती. आता पथकराचे दर अचानक वाढल्याने, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. सुधारीत दर निश्चितीनंतर टोल दरात अंशतः वाढ करण्यात आली आहे. -रविंद्र इंगोले, संचालक महामार्ग प्राधिकऱण
टोल वसूलीचे काम मनमानी पध्दतीने सुरु आहे. टोल नाक्यावर बोर्डावर कारसाठी ९५ रुपये दर लिहीला आहे. फास्ट टॅगवर १०० रुपये घेतले जात आहेत. तर रोख रक्कम दिली तर १२५ रुपये पथकर आकारणी केली जात आहे. ही आकारणी कुठल्या अधिसूचने नुसार होत आहे. त्याची माहिती इथे उपलब्ध नाही -जतिन म्हात्रे, वाहनचालक

टोल दर अचानक कसे आणि कोणी वाढवले याची माहिती घेतली जाईल, महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी या संदर्भात बोलीन. -सुनील तटकरे, खासदार तथा प्रदेशाध्यक्ष
