रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालाही बसला आहे. लांजा तालुक्यातील देवधे ते वेरळ दरम्यान गुरुवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती व दगड घसरून रस्त्यावर आल्याने दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीस काही काळ अडथळा निर्माण झाला.
सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन त्याखाली सापडले नाही. त्यामुळे जीवितहानी अथवा अन्य कोणतीही दुर्घटना टळली. दरड कोसळल्याने महामार्गाच्या एका बाजूवर माती आणि दगडांचा ढिगारा साचला होता. मात्र प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्याने महामार्ग पूर्णपणे बंद करण्याची वेळ आली नाही आणि वाहतूक सुरू ठेवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली माती आणि दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. काही वेळातच मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येवून वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
