रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर लांजा शहरासह परिसरातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा शहर प्रमुख मोहन तोडकरी यांनी लांजा तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात महामार्गावरील उड्डाणपुलांच्या उतारासाठी करण्यात आलेला भराव निकृष्ट दर्जाचा असून, संबंधित यंत्रणेकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भरावाच्या दोन्ही बाजूंना बसविण्यात आलेल्या इंटरलॉकिंग प्लेट्स बाहेर निघत असून, त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भराव आणि काँक्रीटच्या भागात खचणे व भेगा पडण्याचे प्रकारही समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महामार्गावरील या परिस्थितीमुळे वाहनचालकांसह पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे तोडकरी यांनी म्हटले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या समस्येवर पुढील आठ ते दहा दिवसांत प्रभावी उपाययोजना न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या किंवा अपघाताच्या घटनेस संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
