अलिबाग – मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माणगाव बायपासवरील कोकण रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन्ही लेनचे गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बायपासच्या कामातील महत्त्वाचा टप्पा यशस्वी झाला असून, येत्या दोन महिन्यांत बायपास वाहतुकीसाठी खुला होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना माणगाव शहरातून प्रवास करताना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सुट्ट्या, सण आणि पर्यटन हंगामात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. या पार्श्वभूमीवर माणगाव बायपासचे काम पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
बायपासवरील कोकण रेल्वे उड्डाण पुलाच्या गर्डर बसविण्याचे काम तांत्रिक अडचणी आणि विविध अडथळ्यांमुळे रखडले होते. मात्र, कोकण रेल्वेच्या माध्यमातून नियोजित वेळेत दोन्ही लेनचे गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे बायपासच्या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले असले तरी बायपास वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वी काही उर्वरित कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास येत्या दोन महिन्यांत बायपास सुरू होण्याची शक्यता आहे.
बायपासच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या झाल्यानंतर माणगाव शहरातील वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होईल. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील कोकण प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता उर्वरित कामे किती लवकर पूर्ण होतात आणि बायपास प्रत्यक्ष वाहतुकीसाठी कधी खुला होतो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
