अलिबाग – मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळाली आहे. बायपासवरील कोकण रेल्वे मार्गाच्या क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या एका लेनवर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बायपास सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, एक लेन लवकरच वाहतुकीसाठी खुली होण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे माणगाव शहरातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालक आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने अनेकदा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः गणेशोत्सव, होळी, सलग सुट्ट्या आणि सण-उत्सवांच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो, इंधनाचा खर्च वाढतो आणि स्थानिक नागरिकांनाही वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर माणगाव बायपास लवकर सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

बायपासचे काम गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले होते. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील क्रॉसिंग पुलाचे काम हा महत्त्वाचा टप्पा होता. या पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे गणेशोत्सवापूर्वी बायपासची एक लेन सुरू करण्याचे नियोजन प्रत्यक्षात येऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही प्रवाशांना माणगावमधील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

पहाटेच्‍या ब्‍लॉकमध्‍ये काम

रेल्वे मार्गावरील काम पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. यासाठी २६ ऑक्‍टोबरपासून पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत कामासाठी ब्लॉक देण्यात आला होता. या कालावधीत रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या एका लेनवर गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले. रेल्वे वाहतुकीचे नियोजन, तांत्रिक कामे आणि उपलब्ध वेळेचा योग्य वापर करत हा टप्पा पूर्ण झाल्याने बायपासच्या उर्वरित कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे उड्डाण पुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने माणगाव बायपासच्या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. बायपासची एक लेन सुरू झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा काही भार माणगाव शहराबाहेर वळवणे शक्य होईल. परिणामी शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते. गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने माणगाव बायपासच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. आता उर्वरित काम वेगाने पूर्ण करून बायपासची एक लेन प्रत्यक्ष वाहतुकीसाठी कधी खुली केली जाते, याकडे माणगावकरांसह मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.