अलिबाग – कोकणच्या दळणवळणाचा कणा असलेल्या मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाला अखेर अपेक्षित गती मिळाली आहे. सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेल्‍या वाहतूक कोंडीतून मुक्‍ती मिळावी यासाठी हे काम वायुवेगाने सुरू आहे. मात्र या कामात स्‍थानिकांकडून मोठ्या प्रमाणात अडथळा आणला जात असल्‍याच्‍या तक्रारी आहेत. या अडथळ्यांमुळे बायपासचे काम रखडण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

मे महिन्यापर्यंत बायपासची किमान एक मार्गिका पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते मात्र एप्रिलमध्‍येच हे काम पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने युदधपातळीवर काम केले जात आहे. त्यामुळे माणगाव शहरातून जाणारी जड वाहतूक बायपासमार्गे वळवता येणार असून, शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि प्रवाशांच्‍या वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच संपूर्ण मुंबई–गोवा महामार्ग 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचेही राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नेमकी कोणती कामे सुरू ?

सध्या बायपास मार्गावर आठ पुलांची उभारणी, सर्व्हिस रोडची कामे, बायपासचा मुख्य रस्ता, काँक्रीटीकरण, गडर बसविणे, मातीचा भराव, रस्ता मजबुतीकरण, ड्रेनेज व सुरक्षेसाठी आवश्यक संरचना अशी अनेक कामे समांतर सुरू आहेत. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून दर्जेदार व टिकाऊ काम करण्यावर भर दिला जात आहे.

स्‍थानिकांचे अडथळे

या बायपासच्‍या कामासाठी काही ठिकाणी सुरूंगस्‍फोट घडवले जात आहेत. या स्‍फोटांमुळे आजूबाजूच्‍या गावातील घरांच्‍या भींतीना तडे जात असल्‍याची ग्रामस्‍थांची तक्रार आहे. दोन दिवसांपूर्वी ही तक्रार घेवून ठेकेदाराच्‍या कर्मचारयाकडे जाब विचारण्‍यासाठी आलेल्‍या ग्रामस्‍थांनी त्‍याच्‍याशी हुज्‍जत घातली. या कर्मचारयाला अश्‍लील शिवीगाळ करत कपडे फाटेपर्यंत मारहाण केली हे प्रकरण पोलीस ठाण्‍यात पोहोचले. काही गावांतील गुंड प्रवृत्‍तीचे लोक खंडणी मागत असल्‍याच्‍या देखील तक्रारी आहेत.

दोन ठेकेदारांचे समर्पण

यापूर्वीदेखील माणगाव बायपासचे काम चार वर्षांपूर्वी हाती घेण्‍यात आले होते. परंतु आतापर्यंत दोन ठेकेदारांनी या कामातून काढता पाय घेतला. त्‍यामुळे हे काम बरेच महिने रखडले होते. आता तिसरा ठेकेदार नेमून काम करवून घेतले जात आहे. आणि हे काम सध्‍या जोरात सुरू आहे. परंतु अशा प्रकारच्‍या मारहाणी, दमदाटीच्‍या घटनांमुळे कामगारांचे मनोबल खचते आणि कामगार वर्ग भयभीत होवून निघून गेला तर हे काम पुन्‍हा रखडण्‍याची शक्‍यता आहे.

माणगाव बायपासच्‍या कामात सर्वांनी सहकार्य केले तर पावसाळयापूर्वी एक चांगला रस्‍ता वाहतूकीसाठी खुला होईल. आणि मुंबई गोवा महामार्गावरील सध्‍याच्‍या मोठ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. वारंवार तक्रारी, मारहाण याचा कामावर परीणाम होतो. त्‍यासाठी सर्वांच्‍या सहकार्याची अपेक्षा आहे.-अमित चंदानी, ठेकेदार