अलिबाग : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या मार्गात शनिवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचे विघ्न आले. वाहनांची संख्या वाढल्याने माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागत आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने मुंबई, ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. माणगाव आणि इंदापूर येथील अपूर्ण बाह्यवळण रस्ते, अरुंद बाजारपेठेतील रस्ता आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी असतानाही काही ट्रक आणि केमिकल टँकर रस्त्यावर दिसून आले. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. दरम्यान वाहतूक नियमानासाठी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांकडून कसशीने प्रयत्न केले जात आहेत. पण वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने वाहतूक नियमन कठीण झाले आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी काही ठिकाणी अवजड तसेच हलक्या वाहनांना थांबण्यास आणि पार्किंग करण्यास मनाई केली आहे. पुढील दोन दिवस कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.
वाहतुक कोंडीची कारणे
· अरुंद रस्ता,
· महामार्ग रुंदीकऱणाचे रखडलेले काम
· बेशिस्त वाहन चालक
· अवजड वाहतूक रोखण्यात अपयश
महामार्गावर वाहनांना थांबण्यास मनाई…
दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर तसेच खोपोली वाकण मार्गावर अवजड वाहनांना थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतची वाहतूक अधिसूचना रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी जारी केली आहे. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माणगाव रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोज, मोर्बा नाका ते पवार वाडा, इंदापूर माही हॉटेल ते कशेणे बायपास दरम्यान अवजड तसेच हलक्या वाहनांना थांबण्यास तसे वाहने पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
